व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा शुभारंभ
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 25, 2026
- 21
नवी मुंबई - कॅम्पस कनेक्ट या विशेष मोहीमेच्या माध्यमातून नवी मुंबईतील प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हा नशा विरोधातील लढ्याचे केंद्र बनेल आणि प्रत्येक विद्यार्थी हा या मोहिमेचा सैनिक होईल असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय दुर्दैवाने व्यसनांच्या गर्तेत अडकलेल्या युवकांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी उपचार करणे आणि मानसिक आधार देण्याचे कामही केले जाणार आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानाद्वारे व्यसनमुक्ती विरोधी लढ्याला नवे बळ मिळेल असे ते म्हणाले.
आज समाजात वाढते व्यसन आणि मानसिक ताणतणाव यांमुळे व्यसनमुक्ती केंद्राची गरज खूप वाढली आहे. विशेषत्वाने तरुणाई दारू, ड्रग्स आणि इतर घातक व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. व्यसनांमुळे शरीराचे नुकसान होतेच याशिवाय नैराश्य, भीती यामुळे मनाचे आणि भविष्याचेही मोठे नुकसान होते. त्यावर योग्य उपचारासाठी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची गरज लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सहयोगाने सीबीडी बेलापूर सेक्टर 8 येथील मदर तेरेसा इमारतीमध्ये ‘व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. बांधिलकी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने या केंद्राचे परिचलन केले जाणार आहे. येथे पुनर्वसन कार्यक्रम, जीवन-कौशल्य उपक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षणाशी संबंधित उपक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम तसेच इतर रुग्ण-सहाय्यक कार्यक्रमांचे नियोजन व समन्वय केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 रूग्णखाटा क्षमतेच्या या केंद्राद्वारे व्यसनातून सुटका करण्यासाठी आपुलकीचा आधार दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे समाजात पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी पुनर्वसनासाठी मदत केली जाणार आहे. याकरिता रुग्णाच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. तसेच विविध जनजागृती कार्यक्रम राबवून रुग्णाच्या पुनर्वसनासाठी आणि समाजात त्यांच्या पुनर्समावेशासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलीस विभागामार्फत सूचित केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिके मार्फत चालविल्या जाणाऱ्या या केंद्रात रुग्णाचा प्रवेश झाल्यानंतर, दैनंदिन रुग्ण समन्वय, त्यांच्या कुटुंबियांशी समन्वय, त्यांचे समुपदेशन, पुनर्वसन सहाय्य व फॉलो-अप उपक्रमांव्दारे कार्यवाही केली जाणार आहे. केंद्रात दाखल होणा-या रूग्णाच्या मानसिकतेचा विचार करून त्याच्या कलाने योग्य उपचार करण्याकरिता याठिकाणी कार्यरत कर्मचारी हे आवश्यक अर्हताधारक आणि प्रशिक्षित व अनुभवी असतील. त्या कर्मचा-यांनाही वेळोवेळी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल व पर्यवेक्षण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येईल.
याठिकाणी अनुभवी मानसोपचारतज्ज्ञ, अनुभवसंपन्न मानसशास्त्रज्ञ/समुपदेशक तसेच नर्सेस, वॉर्डबॉय आणि सुरक्षारक्षक असे कर्मचारी कार्यरत असतील. येथील व्यवस्थापनासाठी अनुभवी व्यवस्थापक कार्यरत राहील. या केंद्रामध्ये अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार केले जातील तसेच मानसोपचार तज्ज्ञ रुग्णाशी बोलून त्याच्या मनातील भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर करतील. येथे कॅरम, बुध्दीबळ अशा खेळांच्या सुविधांसोबतच मानसिक शांती, सकारात्मक विचार आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग, ध्यान आणि व्यायामाची सोय असणार आहे. या व्यसनमुक्ती सुविधा केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्त नवी मुंबई साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या सहयोगाने सामाजिक बांधिलकी जपत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai