‘सिडको मास्टर्स कप-2021’ गोल्फ सामना

नवी मुंबई ः सिडकोच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्स या गोल्फ मैदानावर 20 फेब्रुवारी 2021 रोजी ‘सिडको मास्टर्स कप-2021’ या गोल्फ सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेस यांसह मुंबई आणि पुण्यातील बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब (बीपीसीजी), विलिंग्डन गोल्फ क्लब, ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट, पूना गोल्फ क्लब, युएस क्लब आणि गोल्डन स्वान या गोल्फ क्लबमधील गोल्फपटू या सामन्यामध्ये सहभागी होणार आहेत. या प्रसंगी सध्याच्या गोल्फ कोर्सचा 18 होल्सच्या गोल्फ कोर्समध्ये विस्तार आणि आधुनिक सुविधांसह कंट्री क्लब विकसित करण्याच्या आराखड्यांचे अनावरणही करण्यात येणार आहे. या सामन्याचे आणि अनावरण समारंभाचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या समाजमाध्यमांवर करण्यात येणार आहे.

पहिल्या सिडको मास्टर्स कप 2021 सामन्याचा प्रारंभ होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. नजीकच्या काळात खारघर व परिसरात साकार होत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे खारघर भविष्यातील संधींनी अत्याधुनिक नोड बनणार आहे. त्याचबरोबर खारघर नोड हा भविष्यातील स्पोर्ट्स हब बनण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे. सध्याचे गोल्फ कोर्स 18 होल्सचे करण्यात आल्यानंतर व्यावसायिक सामन्यांचे आयोजन करणे शक्य होणार असून त्याद्वारे आंतरराष्ट्रीय पर्यटनासही चालना मिळणार असल्याचे सिडकोचे उपाध्यक्ष तथा  व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.