प्रारुप मतदार याद्यांमध्ये नावांची हेराफेरी

आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारवर आरोप

मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा मतदान यादी कार्यक्रमानुसार 16 फेब्रुवारीला प्रारुप मतदार यादी प्रसिदद्ध करण्यात आली. मात्र या प्रारुप मतदार याद्यांमधे मोठ्या प्रमाणावर हेराफेरी, बनवाबनवी करण्यात आली आहे. मंत्रालयात केबीनमध्ये बसून हे केले जात आहे. अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी 23 फेब्रुवारी रोजी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबईतील मतदार यादीत हेराफेरी होत असल्याचा दावा केला.

महाविकास आघाडी सरकारने उमेदवारांची पळवापळवी केल्यानंतर आता मतदार पळवापळवीचा अनोखा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याबाबत अधिकार्‍यांना लेखी निवेदन दिले तर ते स्वीकारले जात नाही. आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही. 3 मार्चपर्यंत जर कायदेशीर मार्गाने बदल केले नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला. सोसायटी आणि चाळीतील नावे दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे मतदार पसार करणे सुरु आहे. दुसरा प्रकार म्हणजे अधिकार्‍यांकडे तक्रार नोंदवायला गेल्यावर तक्रार घेतली जात नाही. म्हणजे त्यांनी एकप्रकारे मतदारांच्या अधिकारालाच नकार दिला असल्याचे चित्र आहे. मंत्रालयात एसी केबीनमध्ये बसून हे सारे केले जात आहे. याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार शेलार यांनी केली.

एका प्रभागातील नावे दुसर्‍या प्रभागात
नवी मुंबईत 111 प्रभागात एका प्रभागातून दुसर्‍या प्रभागात नावे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो तसेच त्याने गत निवडणुकीमध्ये त्या प्रभागामध्ये मतदान केले आहे, अशा व्यक्तींची नावे इतर प्रभागातील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. प्रभागरचनेनुसार ज्या प्रभागात सोसायट्या / चाळी येतात त्या सोसायट्या आणि चाळीमधील मतदारांची नावे इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.