Breaking News
कोरोना संक्रमणाच्या काळात लॉकडाऊनमुळे उपचारांमध्ये झालेला विलंब आणि जीवनशैलीत झालेले बदल यामुळे डोळ्यांच्या समस्यांचे गांभीर्य आणि आजार बळावले आहेत. विशेषतः ज्येष्ठांच्या बाबतीत हा परिणाम अधिक आहे. 65 वर्षांवरील व्यक्ती कोव्हिडच्या भीतीमुळे हॉस्पिटलमध्ये न गेल्यामुळे गेल्या काही महिन्यात मोतीबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये पाच पट वाढ झाली आहे, असे डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलचे नेत्रविकारतज्ज्ञ म्हणाले. अलीकडील काळात डोळ्याच्या गंभीर स्वरुपाच्या समस्या आणि दृष्टी गेलेल्या व्यक्ती नेत्र रुग्णालयांमध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे.
नवी मुंबईतील डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या महाराष्ट्रातील विभागीय वैद्यकीय संचालक डॉ. वंदना जैन म्हणाल्या, साथीचा पूर्ण प्रभाव जाणवण्याआधी म्हणजे 2019 या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये मोतिबिंदूची समस्या घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये येणार्यांपैकी केवळ 10 टक्के व्यक्तींच्या डोळ्यातील मोतिबिंदू पिकलेला असे. 2020 या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये या संख्येत 50% म्हणजे तब्बल पाच पट वाढ झाली. याचे कारण म्हणजे, हॉस्पिटलमध्ये गेलो तर कोरोनाव्हायरसची लागण होईल, अशी भीती गेले वर्षभर रुग्णांना वाटत होती. ही साथ येण्यापूर्वी अति-पिकलेल्या मोतिबिंदूची समस्या असलेल्या व्यक्ती आम्हाला आढळून आल्या नव्हत्या. ज्या व्यक्तींना आधीपासूनच डोळ्यांच्या समस्या होत्या, त्यांनी साथीच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे समस्यांनी गंभीर स्वरुप धारण केले. ज्यांच्यात नव्याने या समस्या उद्भवल्या होत्या, त्यांनीही डॉक्टरला लगेच भेट देण्याऐवजी थोडी प्रतीक्षा केली. परिणामी गंभीर परिणाम झाले आणि काहींची दृष्टी गेली. हॉस्पिटलला भेट देणार्या रुग्णांची संख्या आता वाढत असली तरी कोव्हिडपूर्व आकडेवारीचा विचार करता ती अजूनही खूपच कमी आहे. विषाणूच्या भीतीमुळे आपण अनेक वर्षे मागे जात आहोत.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार याचा परिणाम केवळ मोतिबिंदूच्या प्रकरणांवर आणि ज्येष्ठ नागरीकांवरच झालेला नाही. डॉ. वंदना जैन म्हणाल्या, डोळ्यांवरील डिजिटल ताणामुळे डोळे कोरडे होण्याच्या समस्येचे प्रमाण या साथीपूर्वी 10% होते, ते वाढून आता 30% झाले आहे. कारण आता वर्क फ्रॉम होम पद्धत वाढीस लागल्यामुळे लोकांना दीर्घकाळ डिजिटल स्क्रीनकडे पाहावे लागत आहे. त्याचप्रमाणे रुग्ण नियमितपणे भेट देत नसल्यामुळे काचबिंदूंची समस्या गंभीर झाल्याचे आम्हाला आढळून आले आहे. मधुमेह असलेल्या अनेक व्यक्तींनी डोळ्यांच्या तपासण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे डोळ्यातील पडद्यामध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याचेही दिसून आले. साथीच्या रोगाचा सामाजिक-आर्थिक परिणामही झाला आहे. कारण अनेकांना शस्त्रक्रियेसाठी खर्च करणे कठीण होऊन बसले आहे. आमच्याकडे येणारे अनेक रुग्ण बचत करण्यासाठी केवळ एका डोळ्याची शस्त्रक्रिया करून घेण्याचा पर्याय निवडत आहेत. 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या मधुमेहींनी वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कारण त्यांच्यापैकी 30 टक्के व्यक्तींना डायबेटिक रेटिनोपॅथीसह मधुमेहाशी संबंधित कोणत्या ना कोणत्या प्रकारचा डोळ्यांचा आजार होण्याची शक्यता असते. यात विलंब केल्यास गुंतगुंत निर्माण होऊ शकते, दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. काचबिंदू झालेल्यांसाठीसुद्धा हे आवश्यक आहे. त्यांची स्थिती अस्थिर असेल किंवा डोळ्यांमध्ये वेदना होणे किंवा दृष्टीमध्ये बदल झाला असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे.
साथीच्या काळात लोकांनी त्यांच्या डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिला आहे. टेलि-कन्सल्ट (दूरसंवाद माध्यमातून सल्ला घेणे) हा चांगला पर्याय आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये योग्य सल्ल्यासाठी हा पर्याय पुरेसा असतो. काही वेळा डॉक्टर तुम्हाला प्रत्यक्ष भेट देण्यास सांगू शकतात. कारण अशा वेळी दुर्लक्ष केले तर डोळ्यांची क्षुल्लक समस्या गंभीर स्वरुप धारण करू शकते. उपचारांना विलंब करण्याऐवजी रुग्णांनी असे नेत्र रुग्णालय निवडावे, जिथे सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात येते, असे डॉक्टर म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai