वाशी मंडळात वीज चोरांविरुद्ध कारवाई

1553 प्रकरणात 275.12 लाख महसुल वसुल

नवी मुंबई ः कोरोनाच्या काळात घरोघरी जाऊन मीटर तपासणी करण्यावर ऑक्टोबर 2020 पर्यंत बंदी असल्यामुळे महावितरणच्या वाशी मंडळ कार्यालयाने नोव्हेंबर 2020 पासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वीज गळती रोखणे, वीज चोरी उघड करणे, सदोष मीटर तपासणे अशी महत्वाची कामे हाती घेतली. यात एकूण 1553 प्रकरणात महसूल रु. 275.12 लाख वसुल झाले आहे.

त्यामुळे माहे नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात महावितरणच्या वाशी मंडळात विद्युत अधिनियम 2003 कलम 135 अन्वय 1191 प्रकरणात व कलम 126 अन्वय 362 प्रकरणात कारवाई झाली असून त्यापोटी कलम 135 अन्वय रु. 255.15 लाख व कलम 126 अन्वय रु. 19.97 लाख रक्कम वसुली झाली आहे. म्हणजे एकूण 1553 प्रकरणात महसूल रु. 275.12 लाख वसुल झाले आहे. प्रामुख्याने सदरची वीजचोरी प्रकरणे वाशी मंडळातील पनवेल, भिंगारी, नावडा, तळोजा, बेलापूर, वाशी, नेरुळ, घणसोली, ऐरोली या भागातील आहेत. या प्रत्येक महिन्याच्या मोहिमेतील सातत्यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले असून वीज गळती कमी होण्यास मदत होत आहे, अशी माहिती वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता, राजाराम माने यांनी दिली. या कारवाईत मुख्य अभियंता, भांडूप परिमंडल, सुरेश गणेशकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदरच्या कारवाईत वाशी मंडळातील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपला सहभाग नोंदवला. या धडक कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले असून सदरची कारवाई अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे, अधीक्षक अभियंता, वाशी मंडळ माने यांनी सांगितले.