‘जम्बो कोव्हीड लसीकरण सेंटर’मध्ये लसीकरणाला प्रारंभ

  नवी मुंबई ः लाभार्थी नागरिकांना आपल्या विभागात घराजवळच कोव्हीडची लस घेता यावी याकरिता कोव्हीड लसीकरण केंद्र वाढीकडे आयुक्त अभिजीत बांगर विशेष लक्ष देत असून सद्यस्थितीत 22 महानगरपालिका रूग्णालय / नागरी आरोग्य केंद्रे तसेच 15 खाजगी रूग्णालये अशा एकूण 37 ठिकाणी सुरू असलेल्या कोव्हीड लसीकरण केंद्रांमध्ये शनिवारी सेक्टर 19 तुर्भे येथील एक्स्पोर्ट हाऊस मधील जम्बो लसीकरण केंद्राची भर पडलेली आहे.

शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून येथील 4 बूथवर लसीकरणाला सुरूवात झाली. हे बूथ सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 8 अशा दोन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून याठिकाणी 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील ज्यांना सहव्याधी (कोमॉर्बिड) आहेत असे नागरिक यांना लसीकरण करण्यात येत आहे. सोमवार 22 मार्च पासून सानपाडा नागरी आरोग्य केंद्रातही होणार लसीकरण याशिवाय आयुक्तांच्या तुर्भे विभागातील पाहणी दौर्‍यामध्ये नागरिकांशी संवाद साधताना सानपाडा भागातील लाभार्थी नागरिकांना लसीकरणासाठी त्याच क्षेत्रात लसीकरण केंद्र उपलब्ध होणे गरजेचे आहे हे त्यांना जाणवले. यावर तातडीने निर्णय घेत आयुक्तांनी निर्देशित केल्याप्रमाणे सानपाडा नागरी आरोग्य केंद्रात सोमवार 22 मार्च 2021 पासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. अशाप्रकारे नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये व त्यांना सहजपणे जवळच्या भागात लस घेणे सोयीचे व्हावे याकरिता लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याकडे आयुक्त अभिजीत बांगर विशेष लक्ष देत आहेत. सध्या ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्तींचे लसीकरण सुरू असून त्यांनी आपल्या नजिकच्या कोव्हीड लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.