सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍या 4 कोरोनाबाधितांवर गुन्हा

नवी मुंबई ः कोव्हिड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना कोव्हीड 19 सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याप्रमाणेच गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींनी घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 

अशाच प्रकारे गृह विलगीकरणात असूनही घराबाहेर फिरणार्‍या सेक्टर 23 नेरूळ येथील मेरिलँड सोसायटीतील दाम्पत्याविरोधात 3 एप्रिल रोजी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या 188 कलमाव्दारे कायदेशीररित्या एफ.आय.आर. नोंदविण्यात आला आहे. याचप्रमाणे सेक्टर 24 जुईनगर येथील सुयोग सोसायटीमधील रहिवाशी असलेल्या 2 कोरोनाबाधित महिलांविरोधातही कोव्हीड 19 बाधित असूनही घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी फिरत सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या 188 कलमाव्दारे एफ.आय.आर. नोंदविण्यात आला आहे. गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार व शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्या घरातच थांबून कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सर्वोतोपरी काळजी घेत असून यापुढील काळात कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधातील कार्यवाही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.