पालकमंत्र्यांनी केली एमजीएममधील आयसीयू सुविधेची पाहणी

नवी मुंबई ः सद्यस्थितीत कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता बेड्स उपलब्धतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यातही विशेषत्वाने आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स उपलब्धतेकडे लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात सुरू करण्यात येत असलेल्या 100 आयसीयू बेड्स आणि 40 व्हेंटिलेटर्स क्षमतेच्या आयसीयू सुविधेची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि समाधान व्यक्त केले.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालकमंत्र्यांना कोव्हीड विषयी नवी मुंबईतील सद्यस्थितीची व त्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तसेच तत्परतेने करण्यात येत असलेल्या रूग्णालय सुविधा वाढीची महिती दिली. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी सदरची सुविधा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी व जनतेसाठी लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिले. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ येथील डॉ. डि.वाय.पाटील रूग्णालयात 200 आयसीयू बेड्ससह 80 व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून गंभीर स्वरूपाची लक्षणे असणार्‍या कोरोना बाधीत रूग्णांना आयसीयू बेड्स मिळण्यात अडचण भासू नये याकरिता एमजीएम रूग्णालय, कामोठे येथे 100 आयसीयू बेड्ससह 40 व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. पुढील 3 दिवसात त्याठिकाणी 70 आयसीयू बेड्स उपलब्ध होणार असून टप्प्याटप्प्याने 25 एप्रिल पर्यंत 100 आयसीयू बेड्स आणि 40 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रुग्णांना बेड्स उपलब्धतेसाठी कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता महानगरपालिकेने 022-27567460 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला असून मागील 10 दिवसात अनेक नागरिकांनी या हेल्पलाईन क्रमांकाचा लाभ घेतलेला आहे. कोरोना बाधीतांच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार त्यांना रूग्णालयीन सुविधा उपलब्ध करून देण्याकडे महानगरपालिकेच्या वतीने बारकाईने लक्ष दिले जात असून नवी मुंबईकर नागरिकांनी कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी ब्रेक द चेन च्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे व मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात धुणे ही कोरोनापासून बचावाची त्रिसूत्री आपली नियमित सवय बनवावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.