नवी मुंबईतही मोफत शिवभोजन उपलब्ध

एपीएमसीतील केंद्रावर प्रतिदिन दोनशे अतिरिक्त शिवभोजन थाळ्या मोफत

नवी मुंबई ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदीच्या कालावधीत गोरगरीब जनता अन्नावाचून उपाशी राहू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व शिवभोजन केंद्रावर प्रतिदिन तीनशे शिव भोजन थाळ्या मोफत देण्याची घोषणा केली आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात चार ठिकाणी शिवभोजनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच शिवसेना नवी मुंबईच्यावतीने एपीएमसी मसाला मार्केट येथील शिवभोजन केंद्रावर अतिरिक्त प्रतिदिन दोनशे थाळ्या मोफत वाटप करण्यात येणार आहेत.

एरवी 10 रुपयाला मिळणारी शिवभोजन थाळी सध्या संचारबंदीच्या काळात मोफत देण्यात येत आहे. त्यानुसार नवी मुंबईतही चार केंद्रांवर मोफत थाळी वाटप सुरु झाले आहे. वाशी महापालिका रुग्णालयाच्या कँटीनमध्ये, वासी सेक्टर 15 येथील सद्दगुरु आहार केंद्र, कोपरखैरणेमधील तिरुपती भोजनालय आणि एपीएमसी बाजारातील मार्केट 2 मधील क्रिश हॉटेलमध्ये शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी पार्सल सुविधा सुरु आहे. 20 एप्रिल रोजी मसाला मार्केट जी-02/62 येथील शिव भोजन केंद्र येथे मोफत शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री यांच्या आदेशाने, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या विशेष सहकार्याने दोनशे अतिरिक्त शिवभोजन थाळ्या 30 एप्रिल पर्यंत मोफत वाटप करण्यात येणार आहेत. एकूण पाचशे थाळ्यांचे प्रतिदिन वाटप या केंद्रावर होणार आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने यांच्या हस्ते मोफत शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लाभार्थी नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचे आभार व्यक्त केले. यावेळी उपशहर प्रमुख संतोष मोरे, शेषेराव आडे, प्रदीप वाघमारे, बेलापुर युवा सेना सरचिटणीस प्रवीण कांबळे, विभाग प्रमुख संजय भोसले, उपविभाग प्रमुख प्रकाश पाटणकर, अनिल शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन साळव, शाखा प्रमुख आंबादास नवले, प्रवीण पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.