झाडांच्या छाटणीसाठी एसओपी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 17
झाडे न पडण्यासाठी करणार उपाययोजना
नवी मुंबई ः महापालिका क्षेत्रात जुलै 2026 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या समस्येवर गांभीर्याने विचार करण्यासाठी आणि त्यावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष तज्ज्ञांसोबत विशेष बैठकीचे आयोजन महापालिका मुख्यालयात करण्यात आले होते. या बैठकीत सांगोपांग सविस्तर चर्चा करण्यात आली आणि यावरील उपाययोजनांच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी जुलै 2026 मधील अतिवृष्टीच्या काळात कोसळून पडलेल्या झाडांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत शहरातील वृक्षसंपदा, या पावसाळ्यात झाडे पडण्याची शास्त्रीय कारणे आणि भविष्यात करायच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये खालील बाबी निर्दशनास आल्या. मुसळधार पाऊस आणि वेगवान वारा हे झाडे पडण्याचे कारण आहेच, मात्र त्यासोबतच झाडे पडण्यासाठी विविध बाबी कारणीभूत असल्याचे समोर आले.
झाडे पडण्याची कारणे
(1) सिमेंट-काँक्रिटचा अतिवापर : रस्ते आणि गृहनिर्माण संस्थांच्या बांधकामादरम्यान झाडांच्या मुळांच्या वाढीसाठी पुरेशी जागा सोडली जात नाही. विविध सुख-सुविधांसाठी वारंवार केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे झाडांची मुळे कापली जातात, ज्यामुळे त्यांची जमिनीवरील पकड सैल होते. याच कारणामुळे रस्त्यालगत आणि सोसायट्यांच्या आवारात 90% पेक्षा जास्त झाडे कोसळतात.
(2) फोटो ट्रॉपिझम : इमारतींमुळे पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने झाडे प्रकाशाच्या शोधात रस्त्याच्या बाजूला झुकतात. यामुळे झाडाचे एका बाजूचे वजन वाढून नैसर्गिक असंतुलन निर्माण होते.
(3) चुकीची छाटणी: झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी न करता केवळ वरच्या किंवा एकाच बाजूने अनपेक्षितपणे छाटणी केल्यामुळे वादळात झाडांवर ताण वाढतो आणि ती पडतात.
(4) पावसाचे पाणी व सैल माती : पहिल्या पावसात पाने ओली होऊन झाडाचे वजन वाढते. त्यातच मुळांच्या बाजूला पाणी साचल्याने माती सैल होते. नवी मुंबई शहर किनारपट्टी भागात असून जमिनीखाली पाणी पातळीवर असल्याने हा धोका अधिक जाणवतो.
(5) प्रजातींचे स्वरूप : फायकस प्रजातीची झाडे रस्त्यालगत लावणे सोयीचे ठरत नाही. तसेच गुलमोहर व सोनमोहर (पेल्टोफोरम) या झाडांचे लाकूड ठिसूळ असल्याने त्यांच्या फांद्या तुटण्याचे प्रमाण जास्त असते. याउलट नारळ व ताडाची झाडे वादळातही टिकून राहतात.
करावयाच्या उपाययोजना
या समस्यांवर मात करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद आणि नगररचनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिका पुढील पावले उचलण्याचे नियोजन करीत आहे :
(1) झाडाच्या वरच्या भागाचे व्यवस्थापन : झाडाचा वरचा भाग योग्य आकारात राखून उंची नियंत्रित केली जाईल, जेणेकरून वाऱ्याचा ताण संतुलित राहील.
(2) संतुलित छाटणी : झाडांचा केंद्रबिंदू संतुलित राहील अशा पद्धतीने तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच छाटणी केली जाईल.
(3) नवीन मानक कार्यप्रणाली: झाडांच्या छाटणीसाठी एक निश्चित एसओपी तयार केली जाईल. झाडे छाटणीची योग्य वेळ मान्सून सुरू होण्यापूर्वी म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यात असेल. ऑक्टोबर महिन्यात छाटणी करणे पूर्णपणे टाळले जाईल.
(4) छायाचित्रीकरण व झुकलेल्या झाडांचे दस्तऐवजीकरण : झाडांच्या छाटणीपूर्वीचे आणि नंतरचे फोटो काढणे बंधनकारक राहील. तसेच सद्यस्थितीत झुकलेल्या सर्व झाडांचे तातडीने फोटो काढून, केस-टू-केस अभ्यास करून त्यावर पुढील निर्णय घेतले जातील.
(5) मूल्यांकन व डेटा संकलन : नुकत्याच पडलेल्या झाडांचे दृश्यमान मूल्यांकन केले जाईल. त्या झाडांची यापूर्वी कधी छाटणी झाली होती का, याचा गेल्या वर्षभराचा जुना डेटा गोळा करून तपासणी केली जाईल. तसेच गरज पडल्यास नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन केले जाईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai