सिडको कळंबोली येथे 800 खाटांचे कोविड केंद्र उभारणार

नवी मुंबई ः मुंबई आणि नवी मुंबईमध्ये होत असलेली कोविड-19 रुग्णांची वाढ लक्षात घेऊन, अधिकाधिक रुग्णांवर तातडीने व प्रभावी उपचार करता यावेत याकरिता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबईतील कळंबोली येथे 800 व मुंबईतील कांजूरमार्ग येथे 2000 खाटांचे सुसज्ज समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) उभारण्यात येणार आहे. कळंबोली केंद्रातील 800 खाटांपैकी 690 खाटा या ऑक्सिजनयुक्त तर 110 खाटा या अतिदक्षता विभागाकरिता असणार आहेत. कांजूरमार्ग केंद्रातील 2000 खाटांपैकी 1400 खाटा या ऑक्सिजनयुक्त, 400 खाटा ऑक्सिजनविरहित आणि 200 खाटा या अतिदक्षता विभागाकरिता असणार आहेत.   

कोविड-19 महासाथीमुळे रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या हद्दीत सिडकोमार्फत अतिरिक्त कोविड केंद्रे उभारण्यात यावीत, अशी विनंती अनुक्रमे पनवेल आणि बृहन्मुंबई महापालिकांकडून राज्य शासनाला करण्यात आली होती. तसेच कोविडच्या दुसर्‍या लाटेमध्ये वाढणार्‍या रुग्णसंख्येला तातडीने व प्रभावी उपचार पुरविण्याकरिता मुंबई आणि नवी मुंबईतील अधिकाधिक कोविड रुग्णांवर उपचार करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सिडकोला नवी मुंबईतील कळंबोली आणि मुंबईतील कांजूरमार्ग येथे समर्पित कोविड केंद्र उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सिडकोकडून कळंबोली येथील भारतीय कापूस महामंडळाच्या गोदामामध्ये 800 खाटांचे तर कांजूरमार्ग येथे 2000 खाटांचे कोविड केंद्र  लवकरच उभारण्यात येणार असून त्यासाठीच्या प्रारंभिक कामांना सुरुवात झाली आहे. कळंबोली येथील केंद्र उभारण्यात आल्यानंतर पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

 कळंबोली येथील केंद्र नॉन इनव्हेझिव्ह व्हेन्टिलेशन (ऑक्सिजन) सुविधेने युक्त असणार आहे. कांजूरमार्ग केंद्रातील 70% खाटा या ऑक्सिजनयुक्त तर 200 खाटा अतिदक्षता विभागाकरिता राखीव असणार आहेत. सदर कोविड केंद्रांची उभारणी राज्य शासनाच्या 01 डिसेंबर 2016 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद आपत्कालीन प्रापण कार्यपद्धती आणि भारत सरकारच्या मालाचे प्रापण कार्यपद्धती निदेशपुस्तिका 2017 मध्ये नमूद आपत्कालीन स्थितीतील कार्यसुपूर्तता कार्यपद्धती आणि आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नमूद प्रशासकीय व वित्तिय कार्यपद्धतीनुसार करण्यात येणार आहे. सदर रुग्णालयांकरिता पायाभूत सुविधांसह पाणी व वीज पुरवठा, डॉक्टर तसेच अन्य वैद्यकीय व्यावसायिकांची नियुक्ती, आवश्यक ती प्रमाणपत्रे प्राप्त करणे, सर्वसाधारण सुरक्षा व अग्नी सुरक्षेची तरतूद करणे, रुग्णालयांतर्गत खाटा, औषधे व अन्य सामुग्री पुरवणे इ. जबाबदार्‍या संबंधित महानगरपालिकांच्या असणार आहेत. 

मुंबई आणि नवी मुंबईतील कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सिडकोतर्फे राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली आणि कांजूरमार्ग येथे लवकरच समर्पित कोविड केंद्रे उभारण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला सिडको सर्वतोपरीने सहाय्य करत आहे व यापुढेही करत राहिल. सदर समर्पित कोविड केंद्रे उभारण्यात आल्यानंतर संबंधित महानगरपालिकांना त्यांचे हस्तांतरण करण्यात येईल 
डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको