विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याची भुमिका

पत्रकार परिषदेत कामोठे ग्रामस्थांचा एल्गार

कामोठे : शंभर हुतात्मे झाले तरी बेहत्तर, विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही भूमिका कामोठे ग्रामस्थांनी मांडली आहे. सिडको संचालक मंडळाने नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. याविरोधात येथील प्रकल्पग्रस्तांचा तीव्र रोष व्यक्त होत असून कामोठे ग्रामस्थांच्या 8 मे रोजी पत्रकार परिषद आयोजित करून विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली. वेळ पडल्यास पराकोटीचा संघर्ष करत वाट्टेल ते मोल देण्याची तयारी ग्रामस्थांनी ठेवली आहे. शंभर हुतात्मे झाले तरीसुद्धा बेहत्तर परंतु नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात यावे, असा एल्गार ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आला.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर असला तरी सुद्धा आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या जीवनामध्ये दि.बा.पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आज आम्ही प्रकल्पग्रस्त बांधव जे काही सुखद जीवनमान अनुभवत आहोत त्याचे संपूर्ण श्रेय हे दि. बा. पाटील साहेबांचेच आहे. त्यांच्यासारख्या झुरणी नेतृत्वाने आम्हा प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के परताव्याचे सूत्र संपूर्ण राज्यात मान्य करून दाखविले. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा विषय येईल तेव्हा आदरणीय लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील यांच्या नावाव्यतिरिक्त दुसर्‍या कुठल्याही नावाचा विचार होऊ शकत नाही अशी भूमिका ग्रामस्थ मंडळाने मांडली. या पत्रकार परिषदेत जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे यांची पंच कमिटीसह सूरदास गोवारी, के. के. म्हात्रे, नगरसेवक शंकर मात्रे, नगरसेवक विजय चीपळेकर, सुधाकर पाटील, सखाराम पाटील, राजेश गायकर, भालचंद्र म्हात्रे, विजय गोवारी, जाना गोवारी, रमेश म्हात्रे, सुनील गोवारी, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.