‘स्वराज्य’ मुख्यालयाचा खर्च 371 कोटींनी फुगला
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2026
- 32
चार वर्षांपासून सुरू असलेले काम रखडले; अतिरिक्त खर्चाला विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी
पनवेल : पनवेल महापालिकेच्या प्रस्तावित ‘स्वराज्य’ मुख्यालयाच्या बांधकामासाठी तब्बल 371 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये बांधकामासाठी 120 कोटी, तर सजावट आणि इतर अनुषंगिक कामांसाठी तब्बल 251 कोटी रुपयांचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांपासून मुख्यालयाचे बांधकाम सुरू असतानाही काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने महापालिकेचा कारभार या नव्या इमारतीत प्रत्यक्षात कधी सुरू होणार? असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.
‘स्वराज्य’ मुख्यालयाचे बांधकाम 2022 मध्ये सुरू झाले. हे काम 30 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, विविध तांत्रिक अडचणी, कामातील बदल आणि बांधकामाच्या संथगतीबाबत देखरेख करणाऱ्या सल्लागार कंपनीकडून प्रशासनाला वेळेत माहिती न दिल्याने प्रकल्प रखडल्याचे सांगण्यात आले. या बदलांचा थेट परिणाम बांधकाम आणि सजावटीच्या खर्चावर झाला असून आता महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. हितेन सेठी असोसिएट्सच्या तेजस्विनी पंडित यांनी सभेत वाढीव बांधकाम खर्च आणि सजावटीसाठी अपेक्षित खर्चाचे सादरीकरण केले. आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मुख्यालयाच्या बांधकामासाठी 112 कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला होता. कामात वाढ झाल्याने हा खर्च 131 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मूळ आराखड्यातील काही कामे, साहित्य तसेच काही ठिकाणच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या कामांसाठी नव्याने निविदा काढावी लागणार आहे. विशेष म्हणजे, मूळ 112 कोटी रुपयांच्या कामापैकी सुमारे 30 कोटी रुपयांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने तेही नव्या निविदेत समाविष्ट करावे लागणार आहे.
डोममुळे ‘स्वराज्य’ला वेगळी ओळख
‘स्वराज्य’ इमारत ही पनवेल महापालिकेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करणारी इमारत ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. इमारतीच्या माथ्यावर भव्य डोम उभारण्यात येणार असून विमानातून किंवा अवकाशातून पाहतानाही त्याची स्वतंत्र ओळख दिसेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. डोमच्या बाहेरील बाजूस काचेची रचना करण्यात येणार असून बांधकामात जीआरसीचा वापर वाढविण्यात आला आहे. वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भविष्यात वारंवार दुरुस्तीची गरज भासू नये यासाठी सल्लागार कंपनीच्या सूचनेनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
काम रखडण्याचे नेमके कारण सभेत अनुत्तरित
दरम्यान, प्रकल्प रखडण्यामागील नेमकी कारणे काय, याबाबत बुधवारीच्या विशेष सभेत प्रशासनाकडून सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही. संबंधित विषयावर आयुक्त चितळे यांनी महापौरांकडे निवेदन करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना न्यायालयीन कामासाठी लवकर निघायचे असल्याने त्यांनी या विषयाला समर्थन असल्याचे सांगत महापौरांकडे परवानगी मागितली. त्यानंतर सभेत आयुक्तांचे अपेक्षित निवेदन झाले नाही.त्यामुळे कोट्यवधींचा खर्च होऊनही प्रकल्पाला विलंब का झाला आणि आता वाढीव 371 कोटींचा आर्थिक भार नेमका का पडला, याचे स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याची चर्चा सभेनंतर सुरू झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai