तौक्तेमुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- May 18, 2021
- 766
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनार्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. या वादळामुळे एकूण 6 मृत्यू झाले असून 9 जण जखमी झाले आहेत. एकूण 12 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनार्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली. रविवारपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनार्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तोक्ते चक्रीवादळ किनार्यालागत येऊ लागले तसतसे विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागात जोरदार पाउस, वादळी वारे वाहू लागले तसेच मुंबईत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला होता. पहाटेपासून तर मुंबईत दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरातही जोरदार वारे तसेच मुसळधार पाउस सुरु झाला. मुंबई महानगरपालिकेने आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर लक्ष ठेवले होते तसेच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली
2 हजार 542 बांधकामांची पडझड
या चक्रीवादळामुळे 2 हजार 542 घरांची अंशत: तर 6 घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात 24, पालघर 4, रायगड 1784, रत्नागिरी 61, सिंधुदुर्ग 536, पुणे 101, कोल्हापूर 27, सातारा 6 अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे. ठाणे 2, रायगड 3, सिंधुदुर्ग 1 असे 6 जण मरण पावले आहेत. मुंबईत 4 , रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी 2 आणि ठाण्यात 1 व्यक्ती जखमी आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी 2 अशी 4 जनावरे मरण पावली आहेत. मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai