महेंद्र घरत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक संस्थांना आर्थिक मदत

नवी मुंबई ः कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे दरवर्षी आपल्या वाढदिवसा निमित्ताने विविध उपक्रमांसोबत सातत्याने सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करत असतात. या वर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग व जनतेवर झालेल्या विपरीत परीणामांचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला व सामाजिक बांधिलकी जपत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्य करणार्‍या सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करण्याचा संकल्प केला.  

वाढदिवसाच्या पूर्वसंधेला आपल्या पनवेल येथिल कार्यालयात वटवृक्ष सामाजिक संस्था (उलवे) अध्यक्ष किरण एकनाथ मढवी, अंत्यविधी सेवा संस्था (सुकापूर), कुष्ठरोग निवारण समिती (शांतीवन), वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था (चिरनेर) या चार संस्थांना प्रत्येकी 50 हजारांचा धनादेश तर अंधव्यक्ती सामाजिक संस्था, (गव्हाण) अशोक धनाजी कोळी यांना पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केले.

वाढदिवस साधेपणाने साजरा करुन समाजातील गरीब गरजूंना जास्तीत जास्त मदत करून समाजापुढे एक आदर्श महेंद्र घरत हे निर्माण करत आहेत, असे गौरवोद्गार यावेळी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी काढले व सर्वांनी त्यांचे आभार मानले. या वेळी महेंद्रशेठ घरत यांचे चिरंजीव कुणाल घरत,वैभव पाटील, किरण मढवी, विवेक केणी, निळकंठ कोळी, नंदकिशोर उरणकर आदी उपस्थित होते.