दोन वर्षांत 5,804 अतिक्रमणे जमीनदोस्त
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2026
- 21
नवी मुंबई ः मागील दोन वर्षांत सिडकोने 110 हेक्टर जमिनीवरील 5,804 अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यशस्वीरित्या निष्कासित करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणमुक्त केली आहे. अतिक्रमण मुक्त झालेली ही जमीन सिडकोच्या महत्त्वाकांक्षी आगामी प्रकल्पांसाठी मोलाची ठरणार आहे.
सिडकोच्या मालकीच्या जमिनींवरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे ही शहर विकास प्रक्रियेमधील गंभीर अडथळा ठरत असून त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण देखील होत आहे. नवी मुंबईच्या नियोजित व समृद्ध विकासाच्या दृष्टीने ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे लक्षात घेऊन सिडकोमार्फत अतिक्रमणांविरोधात सातत्यपूर्ण व अधिक प्रभावी मोहीम राबविण्यात येते. सध्या नवी मुंबई परिसरात सिडकोमार्फत एरोसिटी, एज्युकेशन सिटी, मेडिसिटी, इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क, लॉजिस्टिक पार्क, एंटरटेनमेंट अरेना, मेट्रो तसेच नैना क्षेत्रातील विविध पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी प्रगतिपथावर आहे. विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन मोहिमा या महत्त्वपूर्ण प्रकल्पांशी संलग्न करण्यात आल्या असून नवी मुंबईच्या जागतिक दर्जाच्या विकासामध्ये कोणतेही अनधिकृत बांधकाम अडथळा ठरू नये, यासाठी संबंधित प्रकल्पांसाठी राखीव जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत नवी मुंबई परिसरातील अनधिकृत बांधकामधारकांना मोठ्या प्रमाणावर नोटिसा बजावण्यात आल्या असून शेकडो निष्कासन मोहिमा राबविण्यात आल्या. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे निष्कासित करून मोठ्या प्रमाणावर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली व नियोजित विकासासाठी या जमिनीची क्षमता वृद्धिंगत झाली आहे. अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर संरक्षक कुंपण उभारण्यात आले असून पुनःअतिक्रमण रोखण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच लागू असल्यास या जमिनींचा त्वरित लिलाव करण्यात येऊन त्यांचा उपयोग करणे सुनिश्चित करण्यात येत आहे. खारघर- तुर्भे लिंक रोड प्रकल्पातील अडथळा ठरणाऱ्या झोपड्यांचे झोपडीधारकांसोबत समन्वय साधून निष्कासन करण्यात आले. तसेच सिडकोच्या जमिनीवर अवैधरित्या मलबा टाकणे व माती चोरी प्रकरणी डंपर, ट्रक, जेसीबी व पोकलेन चालकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
नैना क्षेत्रामध्येही संपूर्ण परिसराचा नियोजित विकास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर नोटिसा बजावण्यात आल्या असून निष्कासन मोहिमा राबविण्यात आल्या. तसेच अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली असून त्यामुळे विस्तारित नवी मुंबई परिसरातील शिस्तबद्ध व नियोजित विकासाला अधिक बळ प्राप्त झाले आहे.
सार्वजनिक जमिनींचे संरक्षण करणे तसेच नवी मुंबईचा जागतिक दर्जाच्या नियोजित शहर म्हणून विकास करणे, यासाठी सिडको कटिबद्ध आहे. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात राबविण्यात आलेली व्यापक कारवाई ही बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील सिडकोची ठाम भूमिका अधोरेखित करते. अतिक्रमणमुक्त करण्यात आलेली ही जमीन केवळ आकाराने जास्त नसून एरोसिटी, एज्युकेशन सिटी, मेडिसिटी, लॉजिस्टिक पार्क, एंटरटेनमेंट अरेना आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या उभारणीच्या दृष्टीने उपलब्ध झालेली संधी आहे. नवी मुंबईच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने हे प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून सिडकोची भूसंपदा सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच ही जमीन नागरिकांच्या व्यापक हितासाठी उपयोगात आणण्यासाठी अशा मोहिमा पुढेही अधिक तीव्रतेने राबविण्यात येतील. -विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai