बालकांच्या संरक्षणासाठी विनामूल्य लसीकरण

नवी मुंबई ः लसीकरणाव्दारे अनेक आजारांना प्रतिबंध करण्यात येतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नवी मुंबई महागरपालिका कार्यक्षेत्रात बालकांमधील लसीकरणाव्दारे प्रतिबंध करता येणार्‍या आजारांचे प्रमाण व त्या आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ‘सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम’ सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत गर्भवती माता, नवजात बालके, दोन वर्षा आतील बालके, 5,10 व 16 वर्षांची मुले / मुली यांना लसीकरण करण्यात येत आहे.

ज्या आजारांवर लस उपलब्ध आहे त्या आजारांवरील लसीकरण करुन बालकांमधील आजाराचे व त्यामुळे होणारी आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हे लसीकरण लाभादायक ठरणार आहे. यामध्ये - लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येणार्‍या आजारांसाठी लहान बालकांचे तसेच गरोदर मातांचे लसीकरण नियोजित सत्रांमध्ये करण्यात येत आहे. लसीची क्षमता टिकविण्यासाठी शीत साखळीचे व्यवस्थापन काटेकोरपणे पाळण्यात येत असून प्रत्येक लसीकरीता / इंजेक्शनकरीता स्वतंत्र सुईचा वापर केला जात आहे तसेच जैविक वैद्यकीय कचर्‍याची सुरक्षित विल्हेवाट लावली जात आहे. लसीकरण योग्य रितीने व्हावे याकरिता वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे नियमित प्रशिक्षण / पुनर्प्रशिक्षण केले जात आहे.23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात शाळा, अंगणवाडी, खाजगी दवाखाने, सोसायटी ऑफिस अशा विविध ठिकाणी बाह्यलसीकरण सत्र आयोजित करण्यात येते. तसेच 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व महानगरपालिका रुग्णालये याठिकाणी स्थायी लसीकरण सत्र घेण्यात येते. याशिवाय दगडखाणी, बांधकामे, विरळ झोपडपट्या अशा ठिकाणीही मोबाईल सत्रे आयोजित करण्यात येतात. महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक महिन्याला 301 बाह्य संपर्क सत्रे, 139 स्थायी सत्रे व 30 मोबाईल सत्रे अशा एकूण 469 सत्रांव्दारे लसीकरण करण्यात येते. या सत्रांच्या संख्येमध्ये आवश्यकतेनुसार व मागणीनुसार वेळोवेळी वाढ करण्यात येते. ही सत्रे दरमहा ठराविक दिवशी आयोजित करण्यात येतात. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व लसी मोफत देण्यात येतात.