Breaking News
50 लाख रुग्णांची शक्यता ; 6,759 रुग्णालये ; 90 हजार मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट सरली असली तरी तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दुसर्या लाटेत आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळालं, हाच अनुभव गाठीशी ठेऊन राज्य सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनांचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर सादरीकरण करण्यात आलं. या सादरीकरणात तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी काय तयारी करावी लागेल, हे सांगण्यात आलं. कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती काय आहे त्याचा आढावा घेण्यात आला.
तिसरी लाट ही दुसर्या लाटेसारखीच किंबहुना त्याहूनही भयानक असू शकते असा अंदाज आहे. या लाटेत तब्बल 50 लाख कोरोना रुग्णसंख्या होऊ शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. शिवाय, तिसर्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, तब्बल 5 लाख लहानग्यांना कोरोना होण्याचा धोका तज्ज्ञांच्या समितीने वर्तवला आहे. सध्याच्या अंदाजानुसार राज्य सरकारने यासाठी 893 कोटींची तरतूद केली आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत रेमडेसिवीरची मोठी वाणवा पाहायला मिळाली. कुठेच ही इंजेक्शन मिळत नव्हती, या इंजेक्शनचा काळाबाजारही झाला आणि ती लाख रुपयांपर्यंत विकलीही गेली. हेच पाहता आता राज्य सरकार सतर्क झालंय. दुसर्या लाटेत तब्बल 6 लाख 90 हजार रेमडेसिवीर वापरले गेले. तिसर्या लाटेत तब्बल 8 लाख रेमडेसिवीरची गरज असणार आहे. ही उपलब्ध करुन ठेवण्याची तयारी राज्य सरकार करतं आहे. याशिवाय, दुसर्या लाटेत टोसिलीझुअॅप हे इंजेक्शनही मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं. दुसर्या लाटेत ही 4000 इंजेक्शन लागली होती. तिसर्या लाटेत 10,000 इंजेक्शन मागवण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. याशिवाय दुसर्या लाटेत कोरोना रुग्णांवर हेपॅरिन हे इंजेक्शनचे तब्बल 7 लाख 20 हजार डोस वापरले गेले. तर तिसर्या लाटेत तब्बल 10 लाख इंजेक्शनची गरज लागणार आहे. हेच नाही तर मागील लाटेत 1 कोटी 50 लाख पॅरासिटॅमॉलच्या गोळ्या लागल्या होत्या, तिसर्या लाटेतही तेवढ्याच गोळ्यांची व्यवस्था करावी लागणार आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजन मिळेनासा झाला. दुसर्या लाटेत तब्बल 60 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला गेला. तिसर्या लाटेआधी आता तब्बल 90 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. त्यासाठी राज्य सरकारनेही तयारी केली आहे, आणि राज्यात अनेक ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लान्ट सुरु करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आवारातच हे ऑक्सिजन प्लान्ट असणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai