वाशीत चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम

ओबीसी आरक्षण पुनर्गठित करण्याची मागणी

नवी मुंबई ः ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने त्याच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. नवी मुंबईतही भाजपनेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली वाशीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी नवी मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करुन निषेध केला. तसेच ओबीसी आरक्षण पुनर्गठित करण्याची मागणी करण्यात आली. 

पुणे, मुंबई, नवी मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. नवी मुंबईतही भाजपच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आरक्षण आमच्या हक्काचं.. नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी वाशीतील शिवाजी महाराज चौक परिसर दणाणला होता. यावेळी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत असून सरकारने ज्यापद्धतीने मराठ्यांचे आरक्षण घालवले त्यापद्धतीने ओबींसींचीही माती करण्याचे काम केले आहे. मागासवर्ग गठित करण्याचे काम, एम्पेरिकल डाटा बनवण्याचे काम राज्य सरकारचे आहे पण प्रत्येकवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. ओबीसी मंत्र्यांनीही खोटे आश्‍वासन दिल्याने त्यांंची हक्कालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केल्याने सरकारचा निषेध करत असून 14 महिने ही फाईल मुख्यमंत्री ठाकरे यांच्या टेबलावर असतानाही त्यांना ती खोलून पाहायला वेळ मिळाला नाही. ओबीसींवर अन्याय करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. त्याचा निषेध म्हणून राज्यभर हे चक्काजाम आंदोलन करण्यात येत असल्याचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले. आजच्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, आ.रमेश पाटील, मा.खा.संजीव नाईक, सतिश निकम, दशरथ भगत, अनंत सूतार, भाजपचे नगरसेवक नगरसेविका, महिला युवा ओबीसी मोर्चा व सगळे मान्यवर पदाधिकारी तसेच ओबीसी समाजबांधव सहभागी झाले होते. आंदोलन सुरु असताना पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.