नवी मुंबई मनसेचे राज्य सरकारविरुद्ध आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 05, 2021
- 840
एमपीएससी विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी मनसे आक्रमक ; आंदोलनकर्ते ताब्यात
नवी मुंबई ः एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. स्वप्निलच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. नवी मुंबई मनसेने सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून 5 जुलैला नवी मुंबई ते विधानभवन धडक मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र पोलीसांनी वाशीत मोर्चेकरांना अडवून ताब्यात घेतले. अधिवेशनात एपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेतला नाही तर मनसेचे कार्यकर्ते विधानभवनात घुसतील असा इशारा यावेळी देण्यात आला.
2019 आणि 2020 मध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊनही भरती प्रक्रिया सुरु न झाल्याने स्वप्निल हताश होता. गरीब वडिलांनी सावकारी कर्ज काढून शिकवल्याने स्वप्निल कर्ज कसे फिटेल या विवंचनेत होता. यातून निराश होऊन स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. महाराष्ट्र राज्य सरकारच्या दिरंगाईमुळेच स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याने मनसेचे संवेदनशील नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारविरुद्ध सोमवारी मनसेने नवी मुंबईतून आंदोलनाची हाक दिली. मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकारी / कार्यकर्त्यांनी नवी मुंबई ते विधानभवन असा मोर्चा काढला. सकाळी 7 वाजता वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. परंतु वाशी पोलिसांनी रस्त्यातच मोर्चा अडवून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. ‘स्वप्निलला न्याय मिळालाच पाहिजे, सरकारवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या सरकारच करायचं काय, खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देऊन महाराष्ट्र सैनिकांनी वाशी परिसर दणाणून सोडला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
आत्महत्या होऊन अनेक दिवस झाले तरीही सरकारला जाग येत नाही. स्वप्निल सारख्या हजारो-लाखो तरुण आज नैराश्येत आहेत. केवळ सरकारच्या दिरंगाईमुळे हे झाल्याने सरकारवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली. सरकारमधील आदित्य ठाकरे, रोहित पवार हे युवा नेते का शांत आहेत असाही सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला. येत्या दोन दिवसात अधिवेशनात सरकारने एपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेतला नाही तर मनसेचे कार्यकर्ते विधानभवनात घुसतील असा इशारा शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सरकारला दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai