गणेशोत्सवाचा प्रवास अधिक सुलभ
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2026
- 21
अतिरिक्त बसचे नियोजन ; 30 गाड्यांचे गट आरक्षण; 112 मोफत बस
नवी मुंबई : श्रीगणेशोत्सवाचे वेध लागताच कोकणवासियांसह इतरत्र गावाकडे जाणाऱ्या गणेश भक्तांची लगबग सुरु झाली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पनवेल एसटी आगाराने अतिरिक्त बसचे नियोजन केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गट आरक्षणालाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत 30 गाड्यांचे गट आरक्षण झाले आहे. त्याचवेळी नवी मुंबईतून गणेश भक्तांसाठी 112 मोफत बस सोडण्यात येणार असल्याने गणेशोत्सवाचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
गणेशोत्सवानिमित्त पनवेल एसटी आगारातून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. तसेच नऊ आरक्षित बसही सोडण्यात येणार आहेत. अतिरिक्त बसची वाहतूक 11 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, 11 सप्टेंबरला सहा, 12 सप्टेंबरला 23 आणि 13 सप्टेंबरला एक अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहे. दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्यावतीने नवी मुंबईतील गणेशभक्तांसाठी 112 मोफत एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 11 सप्टेंबर रोजी ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि सीबीडी-बेलापूर येथून या बस कोकण, कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने रवाना होणार आहेत. यासाठी 8,400 प्रवाशांनी नावनोंदणी केल्याची माहिती आहे. यंदा गट आरक्षणाला गतवर्षीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पनवेल आगारातून आतापर्यंत 30 बसचे गट आरक्षण झाले आहे. मुंबई आणि अन्य भागांतून पनवेल, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक स्थलांतरित झाल्याने या भागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकण मार्गावर एसटीबरोबरच रेल्वेचीही अतिरिक्त वाहतूक उपलब्ध करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने पनवेल-चिपळूणदरम्यान 30 अनारक्षित विशेष मेमू फेऱ्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगावदरम्यान चार विशेष गाड्या चालविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यंदा एसटी, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून कोकणाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी राहण्याची शक्यता आहे.
- गट आरक्षण स्वस्त
गणेशोत्सवासाठी एसटीची संपूर्ण बस गटाने आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना यंदा दिलासा मिळाला आहे. एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे 30 टक्के अतिरिक्त शुल्क एसटी महामंडळाने रद्द केले आहे. त्यामुळे कुटुंब, मित्रमंडळी किंवा गावातील मंडळाच्या माध्यमातून एकत्र प्रवास करणाऱ्यांना बस आरक्षित करणे तुलनेने स्वस्त झाले आहे. - नियमित प्रवासी चिंतेत
मोफत आणि गट आरक्षणाच्या बसमुळे हजारो गणेशभक्तांना गाव गाठणे सोपे होणार असले, तरी या व्यवस्थेची दुसरी बाजूही आहे. मोठ्या संख्येने बस राखीव होत असल्याने ऐनवेळी प्रवासाचा निर्णय घेणाऱ्या नियमित प्रवाशांना तिकीट मिळवताना अडचणी येत आहेत. कुटुंबातील एखाद्या सदस्याला अचानक गावी जावे लागल्यास किंवा आरक्षण न केलेल्या प्रवाशांना उपलब्ध जागेसाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai