दिव्यांगाच्या स्टॉलसाठी जलद कार्यवाही करा

पालिका आयुक्तांचे निर्देश ; सिडको व पालिका अधिकार्‍यांची बैठक

नवी मुंबई ः दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत दिव्यांग व्यक्ती व संस्था यांच्यामार्फत सातत्याने होणार्‍या मागणीस अनुसरून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सिडको आणि महानगरपालिका यांच्या संबंधीत अधिकारी वर्गाची संयुक्त बैठक घेतली. सध्या दिव्यांग वापरत असलेल्या स्टॉलच्या जागा सिडकोकडून महानगरपालिकेस हस्तांतरित करणेबाबतची कार्यवाही 10 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश दिले. तसेच दिव्यांगांच्या नवीन स्टॉल करीता सिडकोकडे करण्यात आलेल्या जागांच्या मागणीबाबतची कार्यवाहीदेखील नियोजन करून जलद पूर्ण करावी असेही निर्देशित केले.

सिडकोमार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 104 ठिकाणी दिव्यांगांच्या स्वयंरोजगारासाठी स्टॉलकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेचीही दिव्यांगांना स्वयंरोजगाराकरिता स्टॉलसाठी जागा उपलब्धता करण्याच्या प्रस्तावास मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यास अनुसरून या जागा हस्तांतरणाबाबत महानगरपालिकेमार्फत सिडकोशी पत्रव्यवहार सुरु असून सदरची हस्तांतरण प्रक्रिया जलद पूर्ण करून दिव्यांगांना दिलासा देण्याबाबत ठोस कार्यवाही करावी असे स्पष्ट करत आयुक्त अभिजीत बांगर यांनी दोन्ही प्राधिकरणांच्या संबंधीत अधिकार्‍यांना नियमित समन्वय ठेवून ही हस्तांतरण प्रक्रिया 10 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश दिले. 

त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेकडे दिव्यांग व्यक्ती / संस्थांकडून होणार्‍या मागणीनुसार नवीन स्टॉलसाठी सिडकोकडे 175 स्टॉल्सकरिता 22 सुयोग्य भूखंडांची मागणी करण्यात आली असून त्याबाबतही सिडकोतील संबंधित विभागांनी जलद कार्यवाही करावी अशी सूचना आयुक्तांनी केली. तसेच महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने हे काम जलद मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा असे निर्देश दिले. अशाचप्रकारे गटई कामगाराच्या स्टॉलचाही प्रलंबित विषय परस्पर समन्वयाने मार्गी लावण्यासाठी सिडकोच्या वतीने धोरण ठरविण्यात यावे असे आयुक्तांनी सूचित केले. नवी मुंबई महानगरपालिका दिव्यांगांकरिता विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी देशभरात नावाजली जात आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी स्टॉलकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबतही महानगरपालिका सकारात्मक असून याविषयी अधिक गतीने पाठपुरावा करून सातत्याने आढावा घेत हा विषय मार्गी लावणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे.