मनसेने काढला रिक्षा चालकांचा अपघाती विमा

53 रिक्षा चालकांना विम्याचे वितरण

नवी मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घणसोली विभाग मनसे तर्फे काढण्यात आलेल्या रिक्षा चालकांच्या अपघाती विम्याचे वितरण रिक्षा चालकांना कोपरखैरणे येथे करण्यात आले. यामध्ये 53 रिक्षा चालकांचे अपघाती विमा काढले गेले. आणखी 100 जणांना लवकरच विमा वाटप करण्यात येणार आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 53वा वाढदिवस 14 जून रोजी होता. त्या अनुषंगाने घणसोली विभाग मनसे अध्यक्ष नितीन नाईक, शाखा अध्यक्ष भरत लोंढे आणि जनहित कक्ष सहसचिव बालाजी लोंढे यांनी 153 रिक्षा चालकांचा अपघाती विमा काढण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार मागील 21 दिवस रिक्षा चालकांच्या घरोघरी जाऊन 53 रिक्षा चालकांचे अपघाती विमा काढले गेले. या अपघाती विमा प्रमाणपत्र वितरण रिक्षा चालकांना 6 जुलै रोजी करण्यात आले. उर्वरित 100 रिक्षा चालकांचे अपघाती विमा पुन्हा घरोघरी जाऊन काढण्यात येणार आहेत, असे घणसोली विभाग मनसे अध्यक्ष नितीन नाईक यांनी सांगितले.

कोपरखैरणे सेक्टर-14 मधील मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्या कार्यालयमध्ये रिक्षा चालकांना अपघाती विमा कागदपत्रे वितरित करण्यात आली. याप्रसंगी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, सचिव सचिन आचरे, रस्ते आस्थापना संघटक संदीप गलगुडे, शाखा अध्यक्ष देवानंद खिलारी, आयोजक नितीन नाईक, भरत लोंढे, बालाजी लोंढे तसेच मनसैनिक, रिक्षा चालक उपस्थित होते.