इन्शुरन्स एजंटची 3 लाखांची फसवणुक

नवी मुंबई ः हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढून घेण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी सीवूड्स मधील एका इन्शुरन्स एजंट तरुणीला ऑनलाईन पॉलिसीची रक्कम पाठविण्याच्या बहाण्याने तिच्या मोबाईलवर स्कॅन करण्यासाठी कोड पाठवून तिच्या बँक खात्यातून तब्बल 3 लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरटयावर फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. 

या घटनेत फसवणुक झालेली 21 वर्षीय तरुणी सीवूड्स भागात कुटुंबासह राहण्यास असून ती एका इन्शुरन्स कंपनीत इन्शुरन्स ऍडव्हायजर म्हणुन कामाला आहे. गत महिन्यात सायबर चोरट्याने साहील कुमार नावाने तरुणीला संपर्क साधुन तो आर्मीमध्ये नोकरीला असल्याचे भासविले होते. तसेच तिच्याकडून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढून घेण्यासाठी संपर्क साधला. यावेळी सदर तरुणीने पॉलिसीबाबत माहिती देऊन पॉलिसीचा पहिला हफ्ता 6632 रुपये असल्याचे सांगितले. त्यावर सायबर चोरट्याने पॉलिसीची रक्कम पाठविण्याचा बहाणा करुन तिच्या मोबाईलवर पेटीएमचा कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितले. तरुणीने सदरचा कोड स्कॅन केला मात्र तो कोड मॅच झाला नसल्याचे सांगून तरुणीला अनेकवेळा कोड स्कॅन करण्यास भाग पाडले.

या दरम्यान तिच्या बँक खात्यातून रक्कम दुसर्‍या खात्यात वळती होत गेली मात्र तरुणीला ते समजलेच नाही. अशा पद्धतीने या सायबर चोरट्यांनी सदर तरुणीला रोख रक्कम पाठविण्याचा बहाणा करुन वेगवेगळ्या रक्कमेचे कोड स्कॅन करण्यास पाठवून गुगल पे व पेटीएमच्या माध्यमातून तिच्या खात्यातून तसेच तिच्या बहिण्याच्या खात्यातून एकुण 3 लाख 2 हजारांची रक्कम काढून घेतली. त्यानंतर तरुणीने आपल्या मोबाईलवर आलेला मेसेज तपासल्यानंतर तिची फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर सदर तरुणीने एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांवर फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्ह दाखल करुन या प्रकरणाचा तपासाला सुरुवात केली आहे.