ऐरोलीत उभारणार मराठी भाषा भवन उपकेंद्र
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 13, 2021
- 807
भूखंडाचे सिडकोकडून राज्य शासनाकडे हस्तांतरण
नवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या उभारणीकरिता महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाला देण्यात आलेल्या, नवी मुंबईतील ऐरोली येथील भूखंडाचे 13 जुलै 2021 रोजी मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अधिकार्यांतर्फे हस्तांतरण करण्यात आले. यामुळे प्रस्तावित मराठी भाषा भवन उपकेंद्रामुळे संबंधित सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत.
मराठी भाषा विकास व संवर्धनाकरिता कार्यरत असणार्या भाषा संचलनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था, या संस्थांची कार्यालये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणून त्यामध्ये एकसूत्रता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 2016 मध्ये सिडकोकडे भूखंडाबाबत विचारणा केली होती. त्यानुसार, सिडकोकडून ऐरोली येथील सेक्टर-13 मधील भूखंड क्र. 6अ हा अंदाजे 3000 चौ.मी. चा भूखंड मराठी भाषा भवन उपकेंद्राकरिता निश्चित करण्यात येऊन, दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने या भूखंडाचा ताबा राज्य शासनाला देण्यात आला. त्याचप्रमाणे इमारतीची उभारणी करण्याची जबाबदारी शासनातर्फे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास देण्यात आली आहे अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली. सदर भुखंडाच्या हस्तांतरणावेळी देसाई यांनी सदर भूखंडाची पाहणी केली. मराठी भाषा भवन उपकेंद्राची इमारत ही बहुउद्देशीय सामाईक सुविधांनी युक्त असणार आहे. या इमारतीत ग्रंथालय, बैठकांसाठी बहुउद्देशीय सभागृह यांसह भाषाविषयक विविध उपक्रमांची कार्यालये व अध्यक्षांसाठी स्वतंत्र दालनांची व्यवस्था असणार आहे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. या प्रसंगी मिलिंद गवादे, सहसचिव, मराठी भाषा विभाग, एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको,अनिल पवार, अपर जिल्हाधिकारी तथा महाव्यवस्थापक (वसाहत) सिडको, प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको, बी. डी. राठोड, सहाय्यक भूमापन अधिकारी, सिडको तथा सिडकोचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai