दोन डोस घेतलेल्यांंना महाराष्ट्र प्रवेश सुलभ होणार

मुंबई ः कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी आता आरटीपीसीआर चाचणी करण्याची सक्ती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र दुसरा डोस घेतल्यानंतर पंधरा दिवसांच्या मुदतीनंतरच संबंधीत व्यक्तींना महाराष्ट्रात ही सुट मिळणार आहे.

गुरूवारी रात्री राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हा अध्यादेश जारी केला. अशा व्यक्तींकडे लसीकरण पूर्ण झाल्याचे कोविन पोर्टलचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ही सवलत देशांतर्गत आणि देशाबाहेरून महाराष्ट्रात येणार्‍या सर्वांसाठी लागू असणार आहे. दरम्यान अन्य प्रवाशांसाठीची आरटीपीसीआर चाचणीची वैधता 48 तासांऐवजी 72 तास इतकी करण्यात आली आहे.