गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

नवी मुंबई पालिकेेचे आवाहन ; मार्गदर्शक सूचना जारी

नवी मुंबई : कोरोनामुळे या वर्षीही सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असून त्यासाठी मार्गदर्शक सूचना पालिकेने जाहीर केल्या आहेत. या परिपत्रकान्वये गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे. 

कोरोना संसर्गामुळे अत्यंत साधेपणाने सण साजरा करण्याचे आवाहन शासनाने यापुर्वीच केले आहे. नवी मुंबई पालिकेनेही 19 जुलै रोजी परिपत्रक काढून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पालिकेच्या धोरणानुसार संबंधित विभागांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. रीतसर परवानगीशिवाय मंडपाची उभारणी सुरू करू नये. मंडप दिलेल्या नियमावलीतच मर्यादित स्वरुपाचे असावेत. अन्यथा मंडपांवर निष्कासनाची कार्यवाही करण्यात येणार आहे. श्री गणेशाची मुर्ती मंडळाकरिता 4 फुट व घरगुती गणपतीसाठी 2 फूटांच्या मर्यादेत असावी. शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तींचे पुजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरण पुरक असल्यास विसर्जन शक्यतो घरीच करावे. घरी शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम स्थळी विसर्जन करण्यात यावे. मंडपामध्ये निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करावी. सोशल डिस्टन्सींग, स्वच्छतेचे पालन करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. सदर मार्गदर्शक सूचना पाळण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

नियमावली

  • उत्सवासाठी परवानगी आवश्यक
  • विसर्जनावेळी गर्दी टाळावी.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबीर तसेच प्रतिबंधात्मक जनजागृती उपक्रम घ्यावेत.
  • ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  • दर्शनासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करावी.
  • ‘श्रीं’च्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  • विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.