1 ऑगस्ट रोजी वाशी न्यायालयात ई-लोक अदालत

नवी मुंबई ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट रोजी वाशी न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळेस ई-लोक अदालतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे व त्याद्वारे दुरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे. तरी इच्छुक पक्षकारांनी लवकर न्यायालयात विनंती अर्ज सादर करावा, असे आवाहन न्यायाधीश तृप्ती देशमुख नाईक यांनी केले.

1 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर लोक न्यायालयात जे पक्षकार हजर राहू शकत नाहीत, त्यांच्याकरिता ऑनलाईन पद्धतीचा वापर करून लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची, वैवाहिक स्वरुपाची, 138 एन.आय.अ‍ॅक्ट चेक संबंधीची दाखल झालेली प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, बँकवसुली प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे इत्यादी प्रकरणे जास्तीत जास्त ठेवून 1 ऑगस्ट 2021 रोजी लोकन्यायालयात सामंजस्य आणि तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याकरिता सर्वांनी सहभाग नोंदवावा याकरिता सर्व पक्षकार, विधीज्ञ यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक तसेच इमेल आयडी विधीज्ञांमार्फत अथवा स्वतः उपस्थित करून द्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. याचा लाभ सर्वांनी घेतल्यास त्यांचा वेळ, पैसा, श्रम वाचेल. तसेच 26 ते 31 पर्यंत पक्षकार व विधीज्ञ हे ऑनलाईन आपल्या प्रकरणातील समस्यांवर न्यायालयासमोर चर्चा करुन सामोपचाराने प्रकरण मिटवू शकतात. म्हणजेच त्यांना केवळ 01 ऑगस्ट 2021 रोजीच्या दिवशी नव्हे तर त्यादिवसापर्यंत चर्चेला वेळ मिळू शकेल. त्याचप्रमाणे ज्या आरोपींचे गुन्हे तडजोडीपात्र आहेत अथवा किरकोळ स्वरुपाचे आहेत ते आरोपी गुन्हा कबुली देऊ शकतात व फिर्यादी ऑनलाईन पद्धतीने त्याची फिर्याद मागवून प्रकरण संपवू शकतात.

वादपूर्व प्रकरणांचा बँक, पतसंस्था, वीजमंडळ, इंटरनेट, फोन आणि मोबाईल संस्था लाभ घेऊन त्याच्या ग्राहकांसोबत होणारे वाद संपुष्टात आणू शकतील. त्यांना त्यासाठी कोणतेही न्यायालयीन किंवा इतर शुल्क देण्याची आवश्यकता नाही. तसेच ग्राहक देखील त्यांची बाजू सांगून बिले नियमित करून घेऊ शकतात. तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन टी. एम. देशमुख-नाईक, अध्यक्षा, तालुका विधी सेवा समिती, वाशी यांनी केले आहे.