टाळेबंदी शिथील होताच वाहन उद्योगाचा वरचा गिअर!

कोविडमुळे लागू करण्यात आलेले निर्बंध कमी केल्याचा फायदा वाहन विक्रीला झाला आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन’(एफएडीए) च्या मते, जुलै 2021 मध्ये वाहन नोंदणीमध्ये 34.12 टक्के वाढ झाली आहे.  जुलै महिन्यात प्रवासी वाहनम्, दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांसह सर्व विभागांमध्ये मोठी वाढ झाली.

गेल्या महिन्यात देशभरात एकूण 15 लाख 56 हजार 777 वाहनं विकली गेली. गेल्या वर्षी याच महिन्यात 11 लाख 60 हजार 721 वाहनं विकली गेली होती. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत तब्बल 165 टक्के वाढ झाली. व्यावसायिक वाहनांना जुलै 2021 मध्ये सर्वाधिक फायदा झाला. एफएडीएनुसार, या श्रेणीमध्ये 52 हजार 130 वाहनांची नोंदणी करण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा 19 हजार 602 युनिट्स होता. जुलै 2019 च्या तुलनेत वाहनांची विक्री 4.84 टक्के कमी आहे. दोन वर्षांपूर्वी या श्रेणीमध्ये 69 हजार 361 वाहनांची नोंदणी झाली होती.

तीनचाकींमध्ये वाहनांच्या विक्रीत 83 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होऊन 27 हजार 904 वाहनांची विक्री  झाली. जुलै 2020 मध्ये हाच खप 15 हजार 244 होता; मात्र दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत तीनचाकी वाहनांची विक्री निम्म्याहून कमी आहे. जुलै 2019 मध्ये तीन चाकी वाहनांच्या 58 हजार 943 युनिट्सची विक्री झाली होती. दुचाकींमध्ये 27 टक्के आणि प्रवासी वाहनांमध्ये 62 टक्क्यांची वाढ झाली. जुलै महिन्यामध्ये 11 लाख 32 हजार 611 दुचाकींची नोंदणी झाली. मागील वर्षी याच महिन्यात आठ लाख 87 हजार 937 युनिट्स विक्री झाली होती. म्हणजेच दुचाकींमध्ये 27.56 टक्के वाढ झाली. त्याच वेळी, 62.90 टक्के वार्षिक वाढीसह प्रवासी वाहन विभागात दोन लाख 61 हजार 744 वाहानांची नोंदणी करण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा एक लाख 60 हजार 681 युनिट्सचा होता. जुलै 2019 मध्ये प्रवासी वाहनांचा खप दोन लाख दहा हजार 626 युनिट्स होता. म्हणजेच 2019 च्या तुलनेत 24.27 टक्के जास्त वाहनांची विक्री झाली. गेल्या महिन्यात 82 हजार 388 ट्रॅक्टर  विकले गेले. गेल्या वर्षी हा आकडा 77 हजार 257 युनिट होता. म्हणजेच, त्यात 6.64 टक्क्यां ची वाढ झाली आहे; मात्र आता हा खप कमी होताना दिसत आहे.

प्रवासी वाहन विभागात मारुतीचं वर्चस्व आहे. जुलै 2020 मध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड 43.67 टक्के मार्केट शेअरसह पहिल्या क्रमांकावर होती. या दरम्यान कंपनीच्या एक लाख 14 हजार 294 वाहनांची नोंदणी करण्यात आली. ह्युंदाई, टाटा मोटर्स लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि किया मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा टॉप  फाईव्हमध्ये समावेश होता. दुचाकीमध्ये हिरो’चं वर्चस्व कायम आहे. कंपनीने गेल्या महिन्यात चार लाख एक हजार 904 युनिट्स विकून 35.48 टक्के बाजार हिस्सा मिळवला. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया लिमिटेड 24.53 टक्के मार्केट शेअरसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.