ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये सरकार नेमणार तक्रार अधिकारी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2021
- 602
नवी दिल्लीः देशातल्या छोट्या व्यावसायिकांना, विशेषत: किरकोळ व्यापार्यांना ऑनलाईन ई-कॉमर्स कंपन्यांमुळे आपला व्यवसाय उद्ध्वस्त झाला, अशी भीती वाटत आहे. देशातल्या व्यापारी संघटना ई-कॉमर्स कंपन्यांना सातत्याने विरोध करत आहेत. व्यापारी संघटनांनीही सरकारकडे ई-कॉमर्स कंपन्यांवर बंधनं आणण्याची मागणी केली होती. त्यावर आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे की सरकार सतत ई-कॉमर्स नियमांवर लक्ष ठेवून आहे आणि ते अधिक परिणामकारक करण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांप्रमाणेच ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये तक्रार अधिकारी नेमण्याचा विचार करत आहे.
आता देशातल्या छोट्या दुकानदारांना ई-कॉमर्स कंपन्यांमुळे त्रास सहन करावा लागणार नाही, असं गोयल यांनी सांगितलं. यासंदर्भातले नियम कडक केले जात असल्याची ग्वाही सरकारने दिली आहे. अनेक महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. गोयल म्हणाले की ई-कॉमर्स कंपन्यांची मनमानी थांबवण्यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांबाबत देशात मोठी चिंता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार ग्राहकांना संरक्षण मिळावं आणि छोट्या दुकानदारांना त्रास होऊ नये, अशी व्यवस्था सरकार करत आहे.
गोयल म्हणाले की सरकार नियमांबद्दल खूप गंभीर आहे. ई-कॉमर्स कंपन्या अधिक नफा मिळवण्यासाठी विविध युक्त्या अवलंबत आहेत. देशातील व्यापारी संघटनांनी त्यांना अनेक वेळा विरोध केला आहे. सरकारने हे स्पष्ट केलं आहे की नवीन नियमांनुसार, प्लॅटफॉर्मवर नोंदणी केलेल्या विक्रेत्यांमधले सर्व प्रकारचे करार पारदर्शक पद्धतीने उघड केले जावेत, ज्यात विक्रेता आणि उत्पादनांविषयीची सर्व माहिती ग्राहकाला अगोदर देणं बंधनकारक आहे. ई-कॉमर्स कंपन्यांची मनमानी थांबवण्यासाठी देशातल्या व्यापार्यांनी आघाडी उघडली आहे. या व्यापार्यांचा आरोप आहे की ई-कॉमर्स संस्था देशभरात फसव्या व्यवहारांद्वारे ग्राहकांची फसवणूक करत आहेत. दुसरीकडे मोठे वैश्विक ई-टेलर सरकारी कायदा आणि धोरणांचं उल्लंघन करतात. कमी किंमत, कमी दरात वित्तपुरवठा, जादा सवलत आणि इतर विविध उपक्रम राबवून ते ग्राहकांना आकर्षित करतात. एकीकडे छोट्या दुकानदारांचा आणि व्यावसायिकांचा ई-कॉमर्स कंपन्यांना विरोध असला तरी ग्राहक मात्र सवलतींवर खूश आहेत. ग्राहकांना त्यांच्या विविध प्रलोभनांची भुरळ पडली असल्याचं एका सर्वेक्षणात आढळलं आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai