भाज्यांची आवक वाढल्याने दरात घसरण

चार वर्षानंतर एपीएमसीत विक्रमी आवक

नवी मुंबई : दुसर्‍या श्रावण सोमवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घाऊक बाजारात वर्षातील उच्चांकी आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये 840 गाड्यांची आवक झाल्याने भाजीपाला दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. जवळपास 4 वर्षांनंतर एवढी मोठी आवक बाजारात झाली आहे. परिणामी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली शिवाय 150 ते 200 भाजीपाला गाड्या बाजार आवारात पडून आहे.

श्रावणात दरवर्षीच भाज्यांना चांगली मागणी असते. भेंडी, हिरवी मिरची, पापडी, वांगी, घेवडा, सिमला मिरची, भुईमूग शेंग, वाटाणा आणि इतर भाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. तर जवळपास सर्व भाज्यांचे दर 10 रुपये किलोच्या खाली आले आहेत. दरवर्षी श्रावणात भाज्यांना मागणी वाढून दर सुद्धा चांगले मिळतात. मात्र, यावर्षी बाजारभावात घसरणच सुरु असल्याने व्यापारी देखील आवाक झाले आहेत. श्रावण मासात मोठ्या प्रमाणात शाकाहार घेतला जातो. त्यामुळे भाजीपाला आणि फळांना मागणी वाढून भाज्यांत दरात वाढ होत असते, मात्र यावेळी तसं घडलेलं नाही. भाजीपाला बाजारात शनिवारीही 620 गाड्यांची आवक झाली होती. आठवड्याचा शेवटचा दिवस असताना पुरेसे ग्राहक बाजारात न आल्याने कवडीमोल भावाने आज भाजीपाला विकावा लागला. जवळपास सर्वच भाज्यांचे दर 10 रुपये प्रतीकिलोच्या खाली आले होते.

भाजीपाला दर
टोमॅटो 8 रुपये, काकडी 8 ते 10 रुपये , भेंडी 4 ते 8 रुपये, दुधी 8 ते 10 रुपये, वांगी 10 रुपये, फ्लॉवर 6 रुपये, कोबी 6 रुपये, कारली 10 रुपये, मेथी जुडी10 रुपये, कोथांबीर जुडी 8 रुपये असा दर भाज्यांचा राहिला.