कोरोना नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा

सहाय्यक पोलीस आयुक्तांचे आवाहन

पनवेल : सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांनी केले आहे. यावेळी सोनावणे म्हणाले, प्रत्येक मंडळाने शहरातील महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत, वीज महावितरण आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची रीतसर परवानगी काढावी. गणरायाच्या आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही परिस्थितीत डिजेला परवानगी मिळणार नाही. पारंपारिक वाद्यांचा आवाजही निर्धारित डेसिबलपेक्षा जास्त नसावा. कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणार्‍यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. 

खांदेश्वर पोलीस ठाणेहद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळ, महिला दक्षता समिती सदस्य व शांतता कमिटी सदस्य यांच्या बैठक पार पडली. सदर बैठक गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना व परवानगीबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोना महामारीमध्ये प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होणे व गर्दी टाळणे यासाठी उपाययोजना करण्याबाबत व काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले व सविस्तर माहिती देऊन मास्कचे वाटप करून मिटींगची सांगता करण्यात आली. यावेळी समस्त मंडळांनी, सहभाग घेऊन पूर्णपणे मदत कार्य चालू ठेऊ व पूर्ण सहकार्य करू याचे आश्वासन दिले. 

  • सहकार्य करण्याचे पोलीसांना आश्‍वासन
    सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्ती ही चार फूट आणि घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांपेक्षा मोठी नसावी. आरती, भजन, कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमांना गर्दी करू नये. कोरोना, डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांविषयी जागृती करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आल्या.
    सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल भागवत सोनवणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर पोलीस ठाणे देविदास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळ, महिला दक्षता समिती सदस्य व शांतता कमिटी सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन श्री कृपा हॉल सेक्टर 6 खांदा कॉलनी येथे करण्यात आले होते.