विविध प्रकल्पांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2021
- 432
सिडको भवनला अजित पवारांची भेट ; नागरी प्रश्नांबाबत साधला संवाद
नवी मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 16 सप्टेंबर 2021 रोजी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनला भेट देऊन नवी मुंबईतील विविध नागरी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. विमानतळाच्या नामकरणासाठी तिन्ही पक्षांशी समन्वय साधून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच गृहनिर्माण प्रकल्प राबविताना सिडकोने मोकळ्या जागा, पार्किंग, व पाण्याचे योग्य नियोजन करावे असे निर्देश पवार यांना सिडकोला दिले. नवी मुंबईतील सिडको, पालिका, एपीएमसी आणि एमआयडीसी या स्थानिक प्राधिकरणांचा आता दर पंधरा दिवसाला आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवारी मुख्यालयात अधिकारी व राष्ट्रवादीच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांसह बैठक घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, खारघर येथील कार्पोरेट पार्क, नैना आदी प्रकल्पांसह प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विशेषत: साडेबारा टक्के भूखंड योजना अद्याप अपूर्ण आहे. सिडकोकडे भूखंड शिल्लक नसल्याच्या तक्रारी आहेत. ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. त्यामुळे केवळ आर्थिक बाजूचा विचार न करता प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, अशा सूचना सिडकोला दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नियोजनाच्या दृष्टीने शहरात मोकळे भूखंड असणे गरजेचे आहे. तसे निर्देश सिडकोला दिले आहेत. ही घरे बांधताना सर्वसामान्य घटकाला समोर ठेवून पायाभूत सुविधांचे नियोजन होणे गरजेचे आहे. विशेषत: पाण्याची पूर्तता, पार्किंग आदी सुविधांना अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे. यासंदर्भात सिडको व्यवस्थापनाला सूचना केल्या असून, याबाबत आपण नियमित आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करण्यासंदर्भात, पुनर्विकास, भूखंड हस्तांतरण या प्रश्नांवर त्यांनी सिडकोला काही निर्देश दिले.
या बैठकीला राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, नवी मुंबईचे निरीक्षक प्रशांत पाटील, ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत आदींसह विभागीय आयुक्त विलास पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह आदी उपस्थित होते.
मी सिडकोच्या संदर्भातील सर्व मुद्दे व बाबी त्याचप्रमाणे नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात विस्तृत माहिती घेतली. याचबरोबर संबंधित अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai