Breaking News
- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुंबई : भारत निवडणूक आयोगामार्फत नवमतदारांपर्यंत निवडणूक संदर्भात माहिती पोहोचविण्यासाठी राज्यात ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग’ (स्वीप) हा जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वसमावेशक सहभाग हे लोकशाहीचे मूलतत्व असल्याने शासकीय- निमशासकीय विभाग, अशासकीय संस्था, स्वायत्त संस्था, युवा-स्त्रिया, दिव्यांग, तृतीय पंथी, ग्रामीण-शहरी नागरिक, आदिवासी, स्थलांतरीत अशा विविध घटकांच्या सक्रिय सहभागाने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी एकत्रितरित्या कार्य करणे आवश्यक आहे. सर्व विभागांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
दृकश्राव्य माध्यमातून मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, सहभाग हा लोकशाहीमध्ये महत्वाचा घटक असून, प्रत्येक विभागाच्या सहभागानेच हे शक्य आहे. नवमतदारांची नोंदणी, नाव वगळणे, नावात बदल अथवा इतर काही बदल करावयाचे असल्यास ते कशापद्धतीने करावयाचे यासंदर्भात मतदार जागरूकता मंचांतर्गत जागरूकता करणे गरजेचे आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व दिव्यांगासाठी काम करणार्या संस्था, संघटीत-असंघटीत कामगार, युवा, प्राध्यापक, वंचित घटकांसाठी काम करणारे कार्यकर्ते, अशा अनेक घटकांनी एकत्रितरित्या काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय विभागाने एका अधिकार्याची स्वीप या कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून निवड करावी. ग्रामविकास विभागाने संविधान दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये मतदारांच्या याद्या वाचाव्यात जेणेकरून ज्या मतदारांचे नाव नसेल त्यांना माहिती देता येईल. प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील अधिकारी-कर्मचार्यांच्या सक्रिय सहभागाने जागृतीपर कार्यक्रम राबवावे व प्रसिद्धी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विविध विभागांच्या सूचनांचाही विचार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वीप सल्लागार दिलीप शिंदे यांनी लोकशाही सक्षमीकरणासाठी मतदार जागृती कार्यक्रम एकत्रितरित्या करणे गरजेचे असल्याचे सांगितले. विविध विभागांनी विविध उपक्रम राबवावे, यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता येईल, असेही त्यांनी सांगितले. विविध शासकीय-निमशासकीय विभाग, सामाजिक संस्था यांनीही यावेळी आपल्या सूचना मांडल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai