Breaking News
तळोजा कारागृहातील घटना ; सुरक्षा वार्यावर
नवी मुंबई : भांडुप येथील एका अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात तळोजा कारागृहात कैदेत असलेल्या संजय यादव नामक आरोपीने पलायन केले आहे. कारागृहातील गार्डची नजर चुकवून 25 फूट उंच असलेल्या सुरक्षा भिंतीवरुन उडी टाकून आरोपीन पलायन केले आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या आरोपीसह त्याच्यासोबत पळून जाताना पकडला गेलेल्या आरोपीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तळोजा कारागृहातील सुरक्षा व्यवस्था वार्यावर असल्याची टिका केली जात आहे.
पळून गेलेला आरोपी संजय यादव हा भांडूप येथील रहिवासी आहे. 2018 मध्ये भांडूपमध्ये झालेल्या एका 17 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात त्याला भांडूप पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर संजय यादव याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी संजय यादव आणि राहुल जैस्वाल दोघेही औषध घेण्याच्या बहाण्याने आपल्या बॅरिकेटमधून बाहेर पडले होते. त्यानंतर दोघेही जेलमधील रुग्णालयाजवळ गेले असताना, तेथील वॉच टॉवरवर गार्ड नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दोघेही वॉच टॉवरच्या जाळीचा दरवाजा उघडून वॉच टॉवरवर चढले. संजय यादव याने वॉच टॉवरला लागून असलेल्या तळोजा जेलच्या 25 फूट उंच भिंतीवर चढून तेथून बाहेर उडी टाकून पलायन केले. यावेळी त्याच्यासोबत असलेला राहुल जैस्वाल हा दुसरा आरोपी भिंतीवरुन उडी टाकण्यास घाबरल्याने तो वॉच टॉवरवरच थांबला. हा प्रकार वॉच टॉवरवर तैनात असलेल्या गार्डच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तत्काळ राहुल जैस्वाल याला पकडले. तसेच पळून गेलेल्या संजय यादव याची माहिती जेल प्रशासनाला दिली. तळोजा जेल प्रशासनाच्या वतीने पळून गेलेला आरोपी संजय यादव आणि राहुल जैस्वाल या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हत्येसारख्या गुन्ह्यात आरोपी असलेला कैदी पळून जाण्यास यशस्वी ठरल्यामुळे मोठी टीका केली जात आहे. तळोजा कारागृहाची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai