Breaking News
36 तासांत पतीची पोलीसांनी केली सुखरुप सुटका
उरण : प्रॉपर्टीच्या वादातून व पत्नीला सोडून दुसर्या महिलेशी संबंध असणार्या पतीचे संतप्त पत्नीनेच सहकार्यांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 36 तासांतच शिताफीने तपास करीत गोव्यातून तीन महिलांसह पाच जणांना अटक करून अपहरण झालेल्या पतीची सुखरूपपणे सुटका केली आहे.
विजयाराजन चेट्टीयार (45) हे मूळचे तामिळनाडूमधील रहिवासी आहेत. त्यांचे बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे सीवूड येथे कार्यालय आहे. ते मागील काही वर्षांपासून नवी मुंबईतच वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी अलगू मीनाक्षी विजयाराजन चेट्टीयार ही तामिळनाडू येथेच राहते. पती-पत्नीत छोट्या मोठ्या गोष्टींसाठी व मालमत्तेसाठी वादविवाद होते. पती-पत्नीत बेबनाव निर्माण झाल्याने अखेर त्यांनी तामिळनाडू येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. घटस्फोटाच्या अर्जावर अद्यापही न्यायालयाने निकाल दिलेला नाही; मात्र मालमत्तेचा वाद संपुष्टात आलेला नसतानाही आणि घटस्फोटाचा न्यायालयात खटला सुरू असतानाही विजयाराजन हे एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची कुणकुण पत्नी अलगू मीनाक्षी हिला लागली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीनेच आपल्या सहकार्यांच्या मदतीने पतीचे अपहरण करून अद्दल घडविण्यासाठी कट रचला. मीनाक्षी हिने नवी मुंबई गाठली. आपल्या दोन महिला सहकारी यांना मालमत्ता खरेदी करण्याच्या नावाखाली बनावट गिर्हाईक बनवून पती विजयाराजन यांच्या सीवूड येथील कार्यालयात पाठविण्यात आले. प्रॉपर्टी दाखविण्यासाठी विजयाराजन हे उलवे येथील खारकोपर येथे दोन महिलांना घेऊन आले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अपहरणकर्त्यांनी दोन महिलांच्या मदतीने विजयाराजन यांचे अपहरण करून गोव्याच्या दिशेने गाडीतून पलायन केले. विजयाराजन उशिरापर्यंत घरी परत न आल्याने अखेर दुसर्या दिवशी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या अपहरणाची तक्रार दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दोन पथके तयार करून घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासताना जीपमधून विजयाराजन यांचे अपहरण झाल्याची माहिती पुढे आली. विजयाराजन यांचा मोबाइल नंबरवरून मिळालेले लोकेशन आणि तांत्रिक बाबींचा आधार घेऊन केलेल्या तपासणीत अपहरणकर्ते पीडित व्यक्तीला कलिगुंट-गोवा येथे घेऊन गेल्याचे निदर्शनास आले. न्हावा-शेवा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खासगी वाहनाने लागलीच गोवा गाठले. पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने निघालेल्या अपहरणकर्त्याची जीप कणकवली पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी थांबताच पोलीस पथकांनी अपहरणकर्त्यावर झडप घालून जेरबंद केले. गाडीत बांधून ठेवलेल्या पीडिताचीही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai