Breaking News
ऐरोलीतील कॉल सेंटरवर छापा
नवी मुंबई : ऐरोली येथे अनधिकृतरित्या सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरवर रबाळे पोलिसांनी छापा मारुन सात जणांना अटक केली आहे. या टोळीने ऍमेझॉन कस्टमर सर्व्हिसच्या नावाने अमेरिकेतील नागरिकांना इंटरनेट कॉलद्वारे संपर्क साधून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भीती दाखवून त्यांच्याकडून डॉलर स्वरुपात मोठी रक्कम उकळत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार या टोळीची कसुन चौकशी करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या कारवाईत कॉल सेंटर चालविण्यासाठी लागणारे 10 लॅपटॉप, 2 राऊटर, 8 मोबाईल फोन व 4 हेडफोन असे साहित्य जप्त करण्यात आल्याचेही पानसरे यांनी सांगितले.
ऐरोली सेक्टर-20 मधील शिवशंकर हाईट्स इमारतीतील 29 व्या मजल्यावर काही व्यक्तींकडून बनावट कॉल सेंटर चालविण्यात येत असल्याचे तसेच सदर कॉल सेंटरमधून ऍमेझॉन कस्टमर सर्व्हीसच्या नावाने अमेरिका या देशातील नागरिकांना व्हिओआयपी कॉल व ई-मेलद्वारे संपर्क साधुन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक अजय भोसले, पोलीस उपनिरीक्षक नागेश शिरसकर, प्रकाश बोडरे व त्यांच्या पथकाने सदर कॉल सेंटरवर छापा मारला. यावेळी सदर फ्लॅटमध्ये 7 व्यक्ती ऍमेझॉन कस्टमर सर्व्हीसेस या नावाने बनावट कॉल सेंटर चालवित असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर टोळीतील सदस्य तेथील कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी कॉल व ई-मेलद्वारे संपर्क साधुन त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये इतर व्हायरस किंवा मालवेअर व्हायरस घुसल्याचे भासवून त्यांचे ऍमेझॉन अकाऊंट हॅक झाल्याची त्यांना भिती दाखवत असल्याचे आढळून आले. तसेच त्यांना अँटी वायरस अथवा सेक्युरिटी सर्व्हीस घेण्यासाठी भाग पाडून त्यांच्याकडून गिफ्ट कार्डद्वारे अमेरिकन डॉलरच्या माध्यमातून पैसे स्विकारत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी संगणक व सायबर तज्ञांच्या माध्यमातून सर्व लॅपटॉपची तपासणी करुन त्यातील सर्व डेटा ताब्यात घेऊन 10 लॅपटॉप, 2 राऊटर, 8 मोबाईल फोन व 4 हेडफोन असे साहित्य जप्त केले.
त्यानंतर पोलिसांनी सदर कॉल सेंटर चालविणारे मेहताब आयुब सय्यद (27), नौशाद रजी अहमद शेख (24), हुसेन शब्बीद कोठारी (35), सौरभ सुरेश दुबे (26), सुरज मोहन सिंग (25), आसिफ हमीद शेख (23) आणि धर्मेश राकेश सालीयन (32) या सात जणांना अटक केली. या टोळीने ऍमेझॉन कंपनीकडे असलेल्या अमेरिका देशातील नागरिकांचा डाटा मिळवून हजारो अमेरिकन नागरिकांकडून मोठया प्रमाणात डॉलर स्वरुपात रक्कम लुबाडली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या टोळीची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai