कुठे घ्यावं घर?
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 08, 2022
- 937
जोखीम टाळण्याऐवजी तिचं व्यवस्थापन करणं हे यशस्वी गुंतवणुकीचं सूत्र आहे. अनेकदा या जोखमीतूनच आर्थिक विकासाची संधी प्राप्त होत असते. गुंतवणूकदारांनी ही बाब नेहमीच लक्षात ठेवायला हवी. मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूक करणार्यांची संख्या खूप मोठी आहे. मालमत्ता क्षेत्रातली दीर्घकालीन गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. मालमत्ता क्षेत्र हे देशभरात रोजगार उपलब्ध करून देणारं दुसर्या क्रमांकाचं क्षेत्र असून कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर हे क्षेत्र झपाट्याने सावरलं. आज ते वेगाने विस्तारणारं क्षेत्र बनलं आहे. मोठ्या प्रमाणावर झालेलं लसीकरण, कोरोनाचं घटणारं प्रमाण, गृहकर्जाचा निचांकी व्याजदर तसंच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर केलेली कर्मचार्यांची भरती या कारणांमुळे मालमत्ता क्षेत्राला चांगले दिवस आले. नव्या वर्षात अनेकांनी मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल. या क्षेत्रात पहिल्यांदाच गुंतवणूक करणार्यांच्या मनात थोडी धाकधूक असते. कोणत्या मालमत्तेत गुंतवणूक करावी, याबाबत गोंधळ असतो. मालमत्तेतल्या गुंतवणुकीतून अधिकाधिक परतावा मिळवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे समजून घेणं आवश्यक आहे.
- मालमत्तेत गुंतवणूक करताना आसपासच्या पायाभूत सोयीसुविधांचा विचार करावा. मालमत्तेच्या स्थानापासून द्रूतगती मार्ग, महामार्ग, मेट्रो स्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळ किती लांब आहे, हे आधी जाणून घ्यावं. परिसरातल्या विकासकामांचा आढावा घ्यावा. झपाट्याने विकसित होणार्या भागातल्या मालमत्तेच्या किंमती भविष्यात वाढण्याची शक्यता असल्यामुळे अशा मालमत्तेची विक्री केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.
- पायाभूत सोयीसुविधा वाढल्या की रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात. कार्यालयांची संख्या वाढल्यावर अन्य सेवा क्षेत्रांचीही वाढ होऊ लागते. अशा भागात घेतलेल्या मालमत्तेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. मग या मालमत्तेला भावही चांगला मिळतो.
- तयार सदनिकांपेक्षाही बांधकाम सुरू असणार्या मालमत्तेत गुंतवणूक करणं अधिक लाभदायी ठरतं. तयार घरांच्या तुलनेत बांधकाम सुरू असणार्या घरांच्या किंमती बर्याच कमी असतात. तसंच या घरांचं बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्यामुळे भविष्यात त्यांच्या किंमती वधारण्याची शक्यताही वाढते. रेरा कायद्यात ग्राहकांना सदनिका वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वं नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा मालमत्तेत केलेली गुंतवणूक आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरते. तसंच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना अन्य लाभही उठवता येतात. बांधकाम सुरू असणार्या मालमत्तेत गुंतवणूक केल्यास पैसे भरण्याचे सुलभ पर्यायही उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे तयार घरापेक्षा बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेतली गुंतवणूक अनेक लाभ मिळवून देऊ शकते.
- नावाजलेल्या विकासकाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेली चांगली ठरते. नावाजलेले विकासक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन प्रकल्प उभारतात. हे विकासक विश्वासार्हही असतात. तसंच त्यांच्या प्रकल्पांमधल्या सदनिका वेळेत उपलब्ध होण्याची शक्यताही बरीच जास्त असते. इथे तुम्हाला अनेक सवलतीही मिळू शकतात. त्यामुळे मालमत्तेत पहिल्यांदाच गुंतवणूक करणार्यांनी नव्या विकासकांपेक्षा नावाजलेल्या विकासकांच्या प्रकल्पांचा विचार करावा.
- बाग, तरणतलाव किंवा रस्त्याच्या बाजूला तोंड असणार्या सदनिकांची खरेदी करताना अतिरिक्त शुल्क भरावं लागतं. या शुल्कामुळे भविष्यात मालमत्ता भाड्याने देताना, विकताना आर्थिक लाभ मिळू शकतात. अशा सदनिकांना मागणीही अधिक असते. प्रकल्पातल्या इतर सदनिकांच्या तुलनेत अशा सदनिकांची किंमत भविष्यात अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सदनिका खरेदी करताना घराच्या खिडकीतून कोणतं दृश्य दिसतं याचा विचार केलेला चांगला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai