निवृत्तीनंतर शासनाकडून पदोन्नती

पाटील व चाबुकस्वार यांची सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभाराचा आणि पालिकेतील अधिकार्‍यांचे हेवेदावे याचा फटका पालिका अधिकार्‍यांच्या पदोन्नतींना बसत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाने 2006 सालच्या पदोन्नतीच्या प्रस्तावाला जरी आता मंजुरी दिली असली तरी ज्या सुरेश पाटलांना ही पदोन्नती दिली आहे. ते गेल्या वर्षीच निवृत्त झाले आहेत. 

 नवी मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेले सुरेश रामु पाटील व सध्या उपायुक्त (परि.1) या पदावर असलेले दादासाहेब चाबुकस्वार या अधिकार्‍यांना सहायक आयुक्त या पदावर पदोन्नती देण्याचा प्रस्तावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव क्र. 681 अन्वये मंजुरी दिली होती. त्यांच्या या नेमणुकीस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 45(4) अन्वये शासन मान्यता देण्याचा प्रस्ताव तत्कालीन पालिका आयुक्तांनी पहिल्यांदा 3 मार्च 2006, दुसर्‍यांदा 29 जून 2013 व नंतर 24 एप्रिल 2015 रोजी पत्राद्वारे शासनास सादर केला होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकृतीबंधास 21 ऑगस्ट 2017 च्या शासननिर्णयाने मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार सहायक आयुक्तांच्या 19 पदांना मंजुरी प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने पालिका आयुक्तांच्या पत्रान्वये व सर्वसाधारण पालिकेच्या ठराव विचारात घेता या अधिकार्‍यांच्या सहायक आयुक्त पदावरील नेमणुकीस शासनाने मान्यता दिली आहे. सुरेश पाटील हे 2017 साली उपायुक्त पदावरुन निवृत्त झाले आहेत. पालिकेतील अधिकार्‍यांतील हेवेदाव्यांमुळे पालिका प्रशासनाने जाणीवपुर्वक या पदोन्नतीच्या मंजुरीचा पाठपुरावा केला नसल्याचे बोलले जाते. चाबुकस्वार हे सध्या उपायुक्त मालमत्ता या पदावर कार्यरत असल्याने त्यांच्या उपायुक्त पदाच्या मंजुरीचाही पाठपुरावा करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.