Breaking News
नवी मुंबई : सिम कार्डचे के.वाय.सी व्हेरीफिकेशन करण्याच्या बहाण्याने एका सायबर गुन्हेगाराने कोपरखैरणेत राहणार्या एका दाम्पत्याच्या मोबाईल फोनमध्ये टिम व्हिवर हे ऍप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे त्यांच्या बँक खात्यातुन 2 लाख 44 हजाराची रक्कम परस्पर काढुन घेतल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. कोपरखैरणे पोलिसांनी या घटनेतील सायबर गुन्हेगाराविरोधात फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणात फसवणुक झालेले व्यावसायीक अविनाश आगासकर (52) हे कोपरखैरणे भागात राहण्यास असून त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. गत 15 जानेवारी रोजी आगासकर यांच्या मोबाईलवर त्यांच्या सिम कार्डचे के.वाय.सी.व्हेरीफिकेशन बाकी असल्याचे व त्यासाठी संपर्क साधण्याबाबत तसेच केवायसी व्हेरीफिकेशन न केल्यास 24 तासात त्यांचा मोबाईल फोन ब्लॉक करण्यात येईल, अशा प्रकारचा मेसेज आला होता. त्यामुळे आगासकर यांनी सदर मेसेजमधील मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता, सायबर गुन्हेगाराने केवायसी व्हेरीफिकेशन करण्याच्या बहाण्याने त्यांना मोबाईल फोनवर टिम व्हिवर ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार आगासकर यांनी टिम व्हिवर हे ऍप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर सायबर गुन्हेगाराने त्यांच्याकडून डेबीड कार्डची माहिती घेऊन गुगल पे द्वारे 10 रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार आगासकर यांनी 10 रुपये पाठविल्यानंतर सायबर चोरट्याने त्यांच्या बचत खात्यातील रक्कम दुसऱया खात्यात वळती करण्यास सुरुवात केली. याबाबतचे मेसेज आगासकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी सायबर चोरट्याला फोन करुन याबाबत माहिती दिली असता, त्याने सदरची रक्कम त्यांच्या खात्यात परत पाठवत असल्याचे भासविले. तसेच त्याच्या मोबाईल नंबरवर पैसे जात नसल्याचा बहाणा करुन त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर टिम व्हिवर डाऊनलोड करण्यास सांगुन त्यांच्या डेबिट कार्डची माहिती त्यांच्याकडून घेतली.
त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या खात्यातील रक्कम देखील दुसऱया खात्यात वळती करण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीने सदर सायबर चोरट्याने आगासकर यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातून प्रत्येकी 1 लाख 22 हजार रुपये अशी एकुण 2 लाख 44 हजार रुपये परस्पर काढून घेतल्यानंतर आपला मोबाईल फोन बंद केला. त्यानंतर सायबर गुन्हेगाराकडून आपली फसवणुक झाल्याचे आगासकर यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोपखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai