तू ही रे माझा मितवा
- by मोना माळी-सणस
- Feb 12, 2022
- 1197
14 फेब्रुवारी या प्रेमाच्या दिवसाची तरुणाई आर्वजून वाट पाहतात. पण प्रेम तर वर्षाचे 365 दिवसही करता येतेच की. मग त्यासाठी खास अशा दिवसाची काय गरज... असो.. प्रेमात कोणतेही बंधन नसावे, आदर आणि विश्वास या फार महत्वाच्या गोष्टी असून संशयाची सावलीही नसावी. तरच ते बहरते..
सतत सोबत असावास
ही मनाची ओढ आहे..
जवळ असलास की वेळ धावत सूटतो
हाच तर काट्यांचा खेळ आहे..
तू दूर गेल्यावर घड्याळ पण हळूहळू चालतं
जिकडे तिकडे मन माझ फक्त तूलाच शोधतं..
विरहात तूझ्या आठवणी जवळ असतात
डोळे मात्र तुझीच वाट पाहतात...
आसूसलेल्या नयनांंना लागली तूझी ओढ
सांग कधी येशील घेऊन आठवणी गोड..
हल्ली तर व्हॅलेंटाइन या दिवसाची निवड करून लग्नाचे मुहूर्त पाहिले जातात. का बरं एवढं महत्त्व दिले जाते या व्हॅलेंटाइन डेला? इतर दिवशी आपण कुणावर प्रेम नाही करू शकत का? प्रेम व्यक्त करायला एकच दिवस कसा काय पुरेसा असू शकतो. असो.. कुणी कितीही काही म्हटलं तरी नकळत सर्वांचीच पावले या दिवसाच्या सेलिब्रेशनकडे वळतात. वर्षभर तर आपण आपल्या जोडीदारावर किंवा आवडत्या व्यक्तीवर प्रेम करतोच; पण या दिवसात अशी काहीतरी जादू असते जी तरुणाईला प्रेमवेडं बनवते. मित्रानो, व्हॅलेंटाइन डे तर साजरा कराच; पण ते प्रेम केवळ एका दिवसापुरतेच नाही तर आठवडा, महिना, वर्ष आणि पुढे आयुष्यभरासाठी करत राहा. प्रेमाच्या माणसांना कधीच दुरावा देऊ नका. आयुष्यात माणसं तोडणं हे एका सेकंदाच काम आहे; पण माणसं जोडणं ही आयुष्यभराची पुंजी असते. म्हणून प्रेम करताना निःस्वार्थी भावना ठेवा जर ती असेल तरच ते यशस्वी होऊ शकेल.
प्रेमात पडलेल्यांसाठी प्रत्येक दिवस निराळा असतो; पण व्हॅलेंटाइन डे म्हटले की काहीतरी स्पेशल, हटके करण्यासाठी महिनाभर आधीच प्लॅनिंग केलं जातं. आपल्या जोडीदाराला काय स्पेशल गिफ्ट देता येईल, तिच्या किंवा त्याच्यासाठी काय सरप्राईज देता येईल याची एखाद्या सोहळ्याप्रमाणे तयारी केली जाते. कॉलेजमध्ये तर आठवडाभर कोणते ना कोणते डेज सुरू असतात. या डेजची सांगता व्हॅलेंटाइन ने केली जाते. व्हॅलेंटाइन हा केवळ प्रियकर-प्रेयसीचाच असतो असे मुळीच नाही. व्हॅलेंटाइन म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड, मनापासून, निःस्वार्थीपणे प्रेम करतो अशी कोणही व्यक्ती आपली व्हॅलेंटाइन असू शकते. या दिवशी काही मुले आपल्या आईवडिलांना गिफ्ट देतात, नातवंड आजी-आजोबांशी प्रेम व्यक्त करतात. यामागे फक्त आणि फक्त निव्वळ प्रेमाचीच भावना असते यात दुमत नसावे.
आतूर या माझ्या मनाला सांग कसे मी आवरु..सतत तूलाच शोधणार्या नजरेला सांग कसे मी सावरु..आठवणीनेच धडधडतातमाझ्या हद्याची स्पंदने..सूटतील का रे कधीआपल्या न भेटीची बंधने..
मित्रांनो, प्रेम म्हणजे केवळ सेलिब्रेशन, गिफ्ट, डेट एवढंच नसते. प्रेम म्हणजे एकमेकांची काळजी घेणे, समोरच्याचा आदर करणे, त्याच्या चुका सुधारण्यासाठी मदत करणे, त्याच्या भावना समजून घेणे आणि शेवटपर्यंत त्याच्या सुख-दुःखात साथ देणे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रेम करताना सॉरी या शब्दाला कधीच अंतर देऊ नका. या सॉरीमध्ये प्रेमाला घट्ट बांधून ठेवण्याची ताकद असते. प्रेमात जर एकमेकांना माफ करायला आणि माफी मागायला कमीपणा वाटला तर याच प्रेमाचे युद्धात रूपांतर होऊ शकते. चूक झाली तर निसंकोचपणे माफी मागावी, तसेच जर समोरच्याकडून चूक झाली असेल तर त्याच्या माफीला क्षमाही करा; पण दोघानींही दरवेळी एकच चूक होणार नाही याची खबरदारी जरूर घ्या. रोज नवीन चुका करा, ज्यातून काही ना काही शिकता येईल. याचबरोबर संवादही तेवढाच महत्त्वाचा आहे. आताच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला एकमेकांशी बोलायला वेळ अपुरा पडू लागलाय; पण जर इतर कामांप्रमाणेच आपल्या माणसांसाठी वेळ काढला तर नक्कीच मिळतो. आयुष्य कितीही धावपळीचं असलं तरी कोणीही खूप बीझी मुळीच नसतं. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सर्वच जण व्हॉट्स अॅप, फेसबुकवर अपडेट असतात. तसंच माणसांच्या बाबतीतही अपडेट राहिलात तर कधीही चांगलंच आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा तेव्हा व्हॉट्स अॅप, फेसबुकला बाजूला ठेवून टाइम काढून आपल्या माणसांशी संवाद साधा. कारण जेवढा संवाद जास्त होईल तेवढं आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो. समोरच्याच्या भावना आपल्याला कळू शकतात. यातूनच प्रेमाच्या रोपट्यांचा वटवृक्ष होईल.
आयुष्यात नको असलेल्या अनेक गोष्टी आपण उराशी बाळगून दुःखात जगतो. भूतकाळातील गत आठवणींना सतत खतपाणी घालतो आणि भविष्याचा विचार करून वर्तमानकाळातील आनंद मात्र गमावून बसतो. भूतकाळातील चुका विसरून त्यातून चांगल्या गोष्टींचा बोध घेऊन वर्तमान काळात जगणे जो शिकतो तोच आनंदाच्या शिखरावर पोहोचण्यास यशस्वी ठरतो. प्रेमाचेही तसेच आहे. आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो आणि त्याला आपली किंमतच कळत नाही त्या वेळी हताश होऊन टोकाची भूमिका न घेता जो आपल्यावर प्रेम करतो त्याचावर प्रेम करायला शिका. जे आपलं नव्हतं ते आपल्याला नाही मिळालं या सकारात्मक भावनेने आहे त्याला अंतर न देता नव्याने सुरुवात करा. इतरांच्या सुखात सुख शोधलं की आपोआप आपल्याही चेहर्यावर आनंद फुलतो. प्रेमात एकमेकांचा आदर करा, समोरच्याचा विश्वास जपा, संशयाला हजार कोस दूर ठेवा आणि निस्वार्थी प्रेम करा.
तूझ्या मिठीत येताना
माझा मलाच विसर पडतो
बिलगून तूला जाताना
चेहरा बघ कसा हसतो...
तूझ्या डोळ्यात पाहताना
होतात जाग्या आठवणी
अश्रू ही गालावर ओंघळतात
लवते जेव्हा पापणी..
तूझ्यासोबत बोलताना
मन तूझ्यातच रमून जाते
गालावरची खळी तूझ्या
नकळतच खुलून जाते...
कासावीस या माझ्या मनात..
तूझ्या आठवणीची होतेय घालमेल..
कधी येईल परतून सरुन जाईल दुराव्याचा वेळ..
सांज-सकाळी येईल मज तूझी आठवण..
सांग कूठे रमवू माझे बैचेन मन..
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस