111 कोटींची करचुकवेगिरी उघड
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 16, 2022
- 504
450 कोटी रुपयांहून अधिक रकमेची बनावट बिले जप्त ; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई ; दोघांना अटक
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सहा महिने विभागास गुंगारा देणार्या जोडप्यास गुजरातमधील सुरत येथून गुरुवार, 10 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून 450 कोटी रुपयांहून अधिक रकमेची बनावट बिले जप्त करण्यात आली आहेत. मुंबई आणि सुरत शहर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखा यांच्या भरीव सहकार्याने ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
मे. डॉल्फिन ओव्हरसीज (प्रोप्रायटरः प्रिमा म्हात्रे) आणि मे प्राईम ओव्हरसीन (प्रोप्रायटरः संजीव सिंग) या दोन कंपन्यांनी करचुकवेगिरी केल्याची गुप्त माहिती व्यापक सर्वसमावेशक विश्लेषण प्रणालीद्वारे अन्वेषण शाखेकडे प्राप्त झाली. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकार्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये या कंपन्यांवर छापे टाकले असता पहिल्या दिवसापासून या दोन्ही कंपन्यांचे संचालक वैद्यकीय कारण देऊन चौकशीसाठी गैरहजर राहिले. त्यानंतर ते फरार झाले.
विभागाच्या कोणत्याही नोटीसांना न जुमानता हे जोडपे महाराष्ट्राबाहेर पळून गेले. या जोडप्याने इतर व्यक्तिंच्या नावे बनावट कंपन्या काढून त्याद्वारे साधारण 482 कोटी रुपयांची बनावट बिले प्राप्त करून 111 कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले. प्रकरणाचे गांभीर्य पाहता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने मुंबई पोलिसांच्या मदतीने व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन या जोडप्याचा ठावठिकाणा शोधून काढला. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाचे व मुंबई पोलिसांचे पथक सुरतला रवाना झाले. सुरत शहर पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या मदतीने व मुंबई पोलीस दलातील माहिम पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांच्या सहकार्याने या जोडप्याला सुरत येथे ताब्यात घेतले गेले. सुरत येथून या जोडप्यास शुक्रवारी पहाटे मुंबई येथे आणले गेले. मुंबई येथे न्यायालयापुढे हजर केले असता दोन्ही आरोपीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईचे नियोजन व अंमलबजावणी राज्यकर सहआयुक्त (अन्वेषण-ब) संपदा मेहता, राज्यकर उपआयुक्त विनोद देसाई, सहाय्यक राज्यकर आयुक्त ऋषिकेश वाघ, राज्यकर अधिकारी स्वाती शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी पार पाडली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai