Breaking News
महिला अत्याचारात वाढ ; सायबर क्राईम रोखण्याचे आव्हान
नवी मुंबई : 21 व्या शतकातील स्मार्ट सिटी म्हणून नावलौकीक असलेले नवी मुंबई शहर गुन्हेगारीतही स्मार्ट असल्याचे समोर आले आहे. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीतून दिसते. यामध्ये महिला अत्याचारात वाढ झाली असून सायबर क्राईम रोखण्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे राहिले आहे. गुन्हेगारीचा आलेख वाढता असला तरी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही जास्त आहे.
कोरोना टाळेबंदीकाळात गुन्हेगारी कमी होती. दरम्यान कोरोनाकाळात कारागृहातील अनेक कच्च्या कैद्यांना सोडण्यात आले होते. ते परत गुन्हेगारीकडे वळल्याने गुन्हेसंख्या वाढली असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. 2020 च्या तुलनेत गुन्ह्यांत 25 टक्के वाढ झाली असून 2021 मध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिह यांनी बुधवारी 2020 व 2021 या वर्षांतील गुन्ह्यांची आकडेवारी पत्रकार परिषदेद्वारे सादर केली. यात 2020 मध्ये 4 हजार 431 गुन्हे दाखल झाले होते. त्यातील 2 हजार 384 उकल झाले होते.
मात्र 2021 मध्ये गुन्हेसंख्या वाढून 5 हजार 865 वर पोहोचली. यातील 3 हजार 366 गुन्हे उकल झाले. यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 हजार 300 गुन्ह्यांची भर पडली आहे. महिला अत्याचारातही वाढ झाली आहे. 2020 मध्ये 125 बलात्काराचे गुन्हे दाखल होते त्यात 87 गुन्ह्यांची भर पडून 2021 मध्ये 212 गुन्हे दाखल झाले आहेत. यातील 211 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच मिसींग व अपहरण झालेल्या महिलांची संख्या 860 असून त्यातील 693 जणींचा शोध लागला असून 168 जणी बेपत्ता आहेत.
गुन्ह्यांची उकल आणि दोषसिद्धी प्रमाणात वाढ करणे हे ध्येय असून कायदा सुव्यवस्था राहणे, तक्रारींची दखल घेणे, सायबर सेलचे गुन्हे उघडकीस आणणे ही आव्हाने आहेत. याशिवाय ड्रग्ज फ्री नवी मुंबई करण्याचा प्रयत्न सुरु आहे. - बिपिनकुमार सिंह, पोलीस आयुक्त
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai