Breaking News
जागतिक महिला दिन विशेष लेख
जागतिक महासत्तांच्या सत्ताखेळामध्ये त्या त्या देशांमधल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. म्हणूनच हा केवळ सध्याच्या रशिया-युक्रेनमधल्या तणावग्रस्त परिस्थितीचा मुद्दा नसून जागतिक स्पर्धेत पुढे जाण्याची अहमिका असणार्या सगळ्याच महासत्तांमधल्या स्त्रियांची ही स्थिती आहे. स्त्रियांना भौतिक सुखांबरोबर शांतताही हवी असते. यंदाच्या जागतिक महिला दिनाला असणारा हा एक महत्त्वपूर्ण संदर्भ म्हणता येईल.
जागतिक महिला दिनी जगभरातल्या महिलांचा विचार होतो आणि त्यांच्या समस्यांकडे जगाचं लक्ष वेधलं जातं. या धर्तीवर यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विचार करता प्रथमत: लक्ष वेधून घेणारा विषय अर्थातच युक्रेन आणि रशियादरम्यानच्या तणावग्रस्त युद्धस्थितीचा आहे. याचं कारण म्हणजे कोणतीही युद्धस्थिती त्या त्या भूभागात राहणार्या स्त्रियांसाठी नेहमीच आव्हानात्मक असते. युद्धस्थितीचे सर्वाधिक भीषण आणि दाहक परिणाम सर्वप्रथम स्त्रियांनाच भोगावे लागतात. या काळात निर्माण होणार्या जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईपासून परकीय आक्रमणामुळे येणार्या सर्व प्रकारच्या बंधनापर्यंत प्रत्येक स्थिती त्यांच्यामध्ये भय आणि असुरक्षितता निर्माण करणारी असते. अशा स्थितीत महिलांवर लैंगिक अत्याचार होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे हे भयही त्यांना ग्रासून टाकतं. आपल्या देशावर अन्य एखाद्या सत्तेनं कब्जा केला असता नागरिक म्हणून आपण सुखरुप नसू, ही असुरक्षितता महिलांमधला ताण शतपटीनं वाढवते. म्हणूनच जागतिक महासत्तांच्या सत्ताखेळामध्ये त्या त्या देशांमधल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतात, हे नाकारुन चालणार नाही. म्हणूनच हा केवळ सध्याच्या रशिया-युक्रेनमधल्या तणावग्रस्त परिस्थितीचा मुद्दा नसून जागतिक स्पर्धेत पुढे जाण्याची अहमिका असणार्या सगळ्याच महासत्तांमधल्या स्त्रियांची ही स्थिती आहे. कारण स्त्रियांना भौतिक सुखांबरोबर शांतताही हवी असते. माझ्या मते, यंदाच्या जागतिक महिला दिनाला असणारा हा एक महत्त्वपूर्ण संदर्भ म्हणता येईल.
कोव्हिडच्या अंमलाखाली घालवलेला दोन वर्षांचा प्रदीर्घ काळ हा देखील यंदाच्या महिला दिनावर सावट असणारा विषय म्हणावा लागेल. कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांच्या काळात महिलांना अनेक प्रकारचे परिणाम भोगावे लागले. अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांप्रमाणे जगण्याच्या सर्व आयामांवर कोरोनामुळे उठलेले घाव त्यांना सहन करावे लागले. कोरोनामुळे स्त्रियांचा रोजगारातला टक्का घटला. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पुरुषांना काही प्रमाणात त्यांचा रोजगार परत मिळाला, मात्र स्त्रियांना मिळाला नाही. त्यामुळे कोरोनाकाळात झालेली आर्थिक उलथापालथ त्यांच्यासाठी अधिक जाचक ठरली. त्यांच्यावर अचानक सगळ्या जबाबदार्या येऊन पडल्या. केवळ भारतातल्या नाही तर पाश्चिमात्य देशांमधल्या महिलांनीही हीच स्थिती अनुभवली. जगभर स्त्रियांच्या बिनपगारी श्रमामध्ये कमालीची वाढ झाली. त्यामुळेच यंदाच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावरील हा अतिरिक्त ताण कमी करण्यास प्राधान्य देणं गरजेचं आहे.
सलग आलेल्या कोरोनाच्या तीन लाटांमध्ये झालेलं स्थलांतर, लांबलेली टाळेबंदी, जाचक बंधनं या सगळ्यांमुळेही स्त्रियांवरील ताण वाढला. यूएनचा रिपोर्ट सांगतो की या काळात अनेक देशांमध्ये कौटुंबिक हिंसा वाढली. महिलांना सोसावी लागलेली ही धगही भयावह आहे. एकीकडे हे मुद्दे असताना सनातनी, उजव्या शक्तींचं वाढलेलं बळही स्त्रियांच्या असुरक्षिततेत भर घालताना दिसत आहे. स्त्रियांवरील सांस्कृतिक बंधनं, त्यांच्या जीवनातला हस्तक्षेप वाढतो आहे. अलिकडे गाजलेलं हिजाबचं प्रकरण याचं उदाहरण ठरेल. सत्ताधारी आपली सत्ता टिकवण्यासाठी समाजामधलं वेगळेपण टिकवू पाहत आहेत. त्यासाठी हिजाबसारखा विषय रंगवून दोन समुदायांमध्ये तिढे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातही परत महिलांचा वापर केला जातो. खरं तर कोणी काय वापरावं हा सर्वस्वी ज्याचा त्याचा मुद्दा असायला हवा. एखाद्या महिलेला हिजाब वापरण्याचं अथवा न वापरण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. याविषयीची कोणतीच सक्ती असता कामा नये. मात्र हा मुद्दा पुढे करुन होणारा मुस्लीम मुलींचं शिक्षण बंद करण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. दुखद बाब म्हणजे न्यायालयदेखील याविषयी ठोस भूमिका मांडताना दिसत नाही. थोडक्यात, अलिकडे वाढत असलेलं उजव्या शक्तीचं आव्हानही विचारात घेण्याजोगं आहे. केवळ आपली पोळी भाजून घेण्यासाठी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा या सगळ्याचा वापर करुन समाजात ताण उत्पन्न करण्याच्या प्रयत्नांमध्ये स्त्रियाच सर्वाधिक भरडल्या जातात हे लक्षात ठेवायला हवं.
एकीकडे स्त्रियांविषयीच्या परिस्थितीचे हे नकारात्मक सूर उमटत असताना काही चांगल्या गोष्टींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्यातली सर्वात सकारात्मक बाब म्हणजे या सर्व प्रतिकूल आणि अन्यायकारक बाबींच्या विरोधात लढण्यासाठी स्त्रिया खंबीरपणे उभ्या रहात आहेत. आता त्या रस्त्यावर उतरत आहेत. आपण पाहतो की लॅटिन अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बलात्कार आणि खुनाच्या घटना वाढल्यानंतर तिथल्या स्त्रियांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलनं केली. अमेरिकेत ‘ब्लॅक लाईङ्ग मॅटर्स’ या चळवळीत मोठ्या संख्येनं स्त्रियांनी सहभाग नोंदवला. आपल्याकडे शेतकरी आंदोलनामध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसला. शाहिनबागमध्ये त्यांची खंबीर भूमिका दिसून आली. अशा प्रकारे अन्याय आणि अत्याचाराविरोधात उभं राहण्यासाठी स्त्रिया, मुली, तरुणी आता आक्रमकतेनं पुढे येताना दिसत आहेत. त्या आपले मुद्दे निडरपणे मांडत आहेत. ही नक्कीच सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
यंदाचा जागतिक महिला दिन अशा सगळ्या मिश्र परिस्थितीत साजरा होत आहे. आता रोजगार हा केवळ पुरुषांसाठीच नसून महिलांसाठीही महत्त्वपूर्ण विषय ठरतो आहे कारण आर्थिक बळ असेल तर महिला आर्थिक, सामाजिक, प्रापंचिक प्रश्नांना खंबीरपणे तोंड देऊ शकतात. त्याचबरोबर शिक्षण हा देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. शिक्षण असेल तरच आपल्यावरील अन्यायाची जाण होते आणि त्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते. सावित्रीबाई ङ्गुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग दाखवला. शिक्षण हे गैरव्यवस्था उलटून टाकण्यासाठी वापरलं जाणारं अस्त्र होतं, हे जाणूनच त्यांनी महिलांना या मार्गावर आणलं. पण अजूनही अनेकींना हा मार्ग सापडलेला नाही. रोजगार आणि शिक्षणापासून आजही काही महिला वंचित आहेत. आता त्यांना पुढे आणण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी सरकारकडून व्यवस्था करवून घेणं गरजेचं आहे. कारण देश-विदेशातली सरकारं राबवत असणारी धोरणं निश्चितच स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवणारी नाहीत. म्हणूनच या योजनांचा रोख स्त्रीकेंद्रीत करण्यासाठी काम करणं गरजेचं आहे.
स्त्रियांची कुटुंबांतर्गत स्थिती हादेखील विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे. घरात स्त्रियांना मिळणारी वागणूक, घरातल्या कामाचं वाटप यात काहीही बदल घडलेला नाही. कोरोनाकाळात या विषयाची जोरदार चर्चा झाली तरी काही उपवाद वगळता परिस्थिती पूर्वी होती तशीच आहे. हे आता बदलायला हवं. पूर्वीपासून स्त्रियांवरच कौटुंबिक जबाबदार्या अधिक प्रमाणात लादल्या गेल्या आहेत. त्या कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सांस्कृतिकदृष्ट्या बघायचं तर आजही स्त्रियांना अनेक बाबतीत गृहीत धरलं जातं. कुटुंब, घरची जबाबदारी हे सगळं सांभाळून तिने कारकिर्द घडवावी असं आजही अनेकांचं मत आहे. अशी मनोवृत्ती बदलणं हीच एक खूप मोठी लढाई आहे. ते लढण्यासाठी महिलांना आणखी तीव्र संघर्ष करावा लागणार आहे, कारण हा विषयच चिवट असून या व्यवस्थेने महिलांवर दीर्घकाळ प्रभाव दाखवणारे संस्कार केले आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी स्त्रियांची मानसिक तयारी होणं हा देखील मोठा विषय आहे.
अर्थातच ही एक लढाई मानली तरी त्यात स्त्रियांनी काही पावलांची दमदार चाल घेतली आहे हे नक्की. पश्चिमात्य देशांमध्ये, रशिया अथवा चीनसारख्या देशांमध्ये सांस्कृतिक बदल आपल्या तुलनेत आधी झाले असले, समाजवादी व्यवस्थेने बाकी सारी संसाधनं उपलब्ध करुन दिली असली तरीदेखील तिथले स्त्रीविषयक सामाजिक संकेत बदलण्यासाठी बराच वेळ लागला. अजूनही तिथली स्त्रियांविषयक पारंपरिक मतं पूर्णपणे बदललेली नाहीत. हे लक्षात घेता आपल्याकडे स्त्रिया चौकटीबाहेर पडत आहे. आता प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग आहे. तीस वर्षांपूर्वी स्त्री पायलट ही संकल्पना नवीन होती. आता या क्षेत्रात अनेक स्त्रिया कार्यरत आहेत. पण कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ आणि त्यासाठी राबवावी लागलेली ‘मी टू’ सारखी चळवळ ही याच नाण्याची दुसरी बाजू आहे. या चळवळीतून समाजातल्या अनेक प्रतिष्ठितांचं बिंग बाहेर काढण्यात महिलांना यश मिळालं. खरं पाहता या चळवळीत सहभागी झालेल्या स्त्रियाही मोठमोठ्या पदांवर कार्यरत होत्या. त्यांचं कार्यक्षेत्र विस्तीर्ण आणि नावाजलेलं होतं. त्या स्वत: मोठं स्थान राखून होत्या. तरीदेखील त्यांना हे सगळं सोसावं लागलं. म्हणजेच लढाई अजूनही सुरू आहे. अर्थात बदल कधीच वेगानं घडत नसतो. एखाद्या क्रांतिकारी घटनेनं होणारा बदल वगळता होणारा बदल नेहमीच मंद असतो पण ठोस असतो. सध्या बदलाचा हाच टप्पा अनुभवायला मिळत आहे.
- किरण मोघे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, (शब्दांकन: स्वाती पेशवे)
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai