युद्धाचा द्राक्ष उत्पादकांना फटका!
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 23, 2022
- 678
नाशिक : रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आता जगभरात जाणवू लागले आहेत. इंधन दरवाढीसह अनेक व्यापार आणि निर्यात व्यवसायांवर परिणाम होत असून आपल्या देशातही याचे चटके बसू लागले आहेत. महाराष्ट्रातल्या द्राक्षनिर्यातीला मोठा फटका बसला आहे. निर्यात कमी झाल्याने द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या नाशिकमधल्या द्राक्ष व्यापार्यांना स्थानिक बाजारपेठेत द्राक्षंकवडीमोलाने म्हणजे अगदी 10 ते 20 रुपये किलो दराने विकावी लागत आहेत.
द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू असतानाच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने या देशांसह युरोपीयन देशांना होणार्या द्राक्ष निर्यातीवरही परिणाम झाला आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून द्राक्षाचा हंगाम सुरू होतो. मार्च महिन्यापासून त्यात आणखी वाढ होते. या हंगामात देशातून सुमारे तीन हजार कंटेनर द्राक्षाची निर्यात होत असते. यंदा मात्र या युद्धामुळे जहाज वाहतुकीवर परिणाम झाल्याने तसंच आर्थिक नुकसानाच्या भीतीने निर्यात करणार्या अनेक व्यापार्यांनी, कंपन्यांनी द्राक्षाची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका शेतकर्यांना बसत आहे. निर्यात करण्यासाठी पिकवलेली उच्च दर्जाची द्राक्षं 70 ते 75 रुपये किलो दराने विकली जातात, तीच आता स्थानिक बाजारपेठेत केवळ 10 ते 20 रुपये दराने विकावी लागत असल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्यात होत नसल्याने ही द्राक्षं बांगलादेशला पाठवण्यात येणार होती; पण अवकाळी पावसामुळे तेही शक्य झालं नाही. आता नवीन पिकासाठी बागा तयार करायच्या असल्याने तयार द्राक्षं लवकरात लवकर विकून बागा मोकळ्या करणं आवश्यक आहे. त्यामुळे नाईलाजाने शेतकर्यांना मोठं नुकसान सोसून मिळेल त्या भावात ही द्राक्षं विकावी लागत आहेत. नाशिकमधून दर वर्षी रशिया, युक्रेन तसंच युरोपीय देशांना 24 ते 25 हजार टन द्राक्षं निर्यात केली जातात; पण युद्धामुळे ही निर्यात 14 ते 15 हजार टन इतकी कमी झाली आहे. त्यामुळे आठ ते नऊ हजार टन द्राक्षं पडून आहेत. निर्यात होणार्या द्राक्षांना 70 ते 75 रुपये किलो असा दर मिळतो; पण आता ती किलोमागे 50 ते 60 रुपये नुकसान सोसून विकावी लागत आहेत.
लवकरात लवकर द्राक्षे विकली जाणं गरजेचं असल्याने शेतकर्यांसमोर मिळेल त्या दराने विक्री करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे वायनरीजही कमी दरात द्राक्षं खरेदी करत आहेत. त्यांच्याशी व्यवहार करताना आपल्याला हवा असलेला दर मागणं आता शेतकर्यांना शक्य नाही. त्यामुळे नाशिकमधले द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले असून युद्ध लवकरात लवकर संपावं आणि किमान पुढील हंगाम तरी सुरळीत पार पडावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai