Breaking News
आणखी दोन आरोपींचा शोध सुरु
नवी मुंबई : एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी पैसे घेवून आलेल्या गाडीचा चालकच पैसे घेवून फरार झाल्याची घटना घडली होती. उलवे येथील एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेले पैसे घेवून हा संदीप दळवी हा चालक फरार झाला होता. अवघ्या दोन दिवसात नवी मुंबई पोलीसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे. आणखी दोन आरोपींचा यात समावेश असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नवी मुंबईमधील उलवे सेक्टर 19 येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी संदीप दळवी हा व्हॅनसह आला होता. यावेळी पेटीत एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली दोन कोटी रूपयांची रक्कम होती. यातील एक कोटी 18 लाख रूपये पेटीतून काढून बँकेचे कर्मचारी एटीएममध्ये भरण्यासाठी गेले. कर्मचारी एटीएममध्ये पैसे भरत असताना व्हॅनमध्ये संदीप हा एकटाच होता. याच गोष्टीचा फायदा घेत दळवी याने व्हॅन घेवून तेथून पळ काढला. एटीएममध्ये पैसे भरत असताना कर्मचार्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आजूबाजूला संदीप याचा शोध सुरू केला. परंतु, एटीएमच्या आसपास तो कोठेच आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले.
संशयित आरोपी संदीप दळवी याने उलवे येथून गाडी सीबीडी येथील अपोलो हॅास्पीटल जवळ आणून ती तिथेच सोडून दिली आणि गाडीतील 82 लाख रूपये घेऊन तो फरार झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात दळवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीसांनी फरार संदीपचा शोध घेत त्याला शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्या चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला असून आणखी दोन साथीदारांचा समावेश असल्याचे सांगितले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai