पावसाळीपूर्व कामांना 15 मे डेडलाईन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 21, 2022
- 619
नवी मुंबई ः कोणतेही संकट सांगून येत नाही, त्यामुळे मागील वर्षी काही झाले नाही असे काहीही गृहीत न धरता आधीपासूनच आवश्यक ती दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर द्यावा असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच त्यांनी सद्यस्थितीत सुरु असलेली कामे पूर्ण करण्यासाठी 15 मे पर्यंतची डेडलाईन दिली आहे.
मान्सून 2022 पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने विविध प्राधिकरणांसोबत आयोजित शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीप्रसंगी समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी नवी मुंबईतील सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून नियोजन करावे व त्याची योग्य प्रकारेअंमलबजावणी करावी असे सूचित केले. यामध्ये सध्या सुरु असलेल्या स्थापत्य विषयक कामांची स्थिती जाणून घेत ही कामे 24 तास सुरु ठेवून 15 मे पर्यंत जलद गतीने व कामाची गुणवत्ता राखून कामे पूर्ण करावीत असे निर्देश दिले. त्यातूनही पावसाळी कालावधीत सुरु ठेवणे आवश्यक असलेल्या स्थापत्य कामांच्या ठिकाणी बॅरेकेटींग लावणे व सुरक्षेच्या इतर उपाययोजना करण्याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आले. रस्ते खड्डेमुक्त असलेच पाहिजेत याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर खड्डा चालणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे दिवाबत्ती व्यवस्थित राहील व विद्युत खांबामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, याकरिता प्रत्येक विद्युत खांबाची काळजीपूर्वक पाहणी करावी असे निर्देश त्यांनी दिले. यामध्ये निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारासह संबंधित अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट शब्दात आदेश दिले. पावसाळी कालावधीत खंडीत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासारख्या अत्यावश्यक कारणाशिवाय रस्ता खोदलाच जाऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना करतानाच तातडीने रस्ता खोदणे आवश्यक असले तरी त्याची कल्पना संबंधित विभाग अधिकारी यांना देण्याचे आयुक्तांनी एमएसईडीसीच्या अधिकार्यांना सूचित केले व महापालिका अधिकार्यांनीही काम झाल्यानंतर त्वरित रस्ते दुरूस्ती करुन घ्यावी असे निर्देश दिले. रस्त्यांवर पडलेल्या डेब्रीजमुळे पाणी साचण्याच्या घटना टाळण्यासाठी डेब्रीज उचलण्याच्या सूचना महानगरपालिकेप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग व एम.आय.डी.सी. प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागालाही आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. कोणत्याही बाबींमुळे नागरिकांना असुविधा होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले. बंदिस्त नाले व नैसर्गिक नाले यांची सफाई विहित वेळेत पूर्ण करावी असे घनकचरा व्यवस्थापन विभागास निर्देश देतानाच नालेसफाई सुयोग्य खोलीपर्यंत करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. सफाईनंतर काठाशी काढून ठेवला जाणारा गाळ थोडासा सुकल्यानंतर लगेच उचलला जावा याविषयी खबरदारी घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.
पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे व तो कोणत्याही प्रकारे दूषीत होणार नाही याची काळजी घ्यावी असे सूचित करण्यात आले.मलनि:स्सारण वाहिन्यांची विहीत वेळेत सफाई पूर्ण व्हावी तसेच त्यावरील झाकणे सुव्यवस्थित असल्याची खातरजमा करून घ्यावी. होल्डींग पाँडवरील फ्लॅपगेट दुरुस्ती आणि पंपींग स्टेशन दुरुस्तीची कामे तत्परतेने करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. पावसाळी काळात सिग्नल यंत्रणा नियमित कार्यान्वित राहील याकडे लक्ष द्यावे. सर्व पथदिवे सुरु राहतील याची खबरदारी घेण्याप्रमाणेच महावितरण कंपनीने उघड्या केबल, डिपीची झाकणे बंद असण्याची खबरदारी घ्यावी व दुरुस्ती करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. पावसाळी कालावधीतील संभाव्य आजार लक्षात घेता महानगरपालिकेकडे आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवणे तसेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि व्यापक जनजागृती करणेबाबत आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या.
पावसाळी कालावधीतील संभाव्य आजार लक्षात घेता आपत्ती नियंत्रण कक्षातील दूरध्वनी कोणत्याही परिस्थितीत अनुत्तरित राहणार नाही अशाप्रकारे यंत्रणा कार्यान्वित असली पाहिजे असे निर्देश देतानाच एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे त्वरित निराकरण झाले पाहिजे याकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देश. रहदारीला अडथळा येणार्या झाडांच्या फांद्यांची आवश्यक तेवढ्याच प्रमाणात छाटणी करावी. या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे तसेच महानगरपालिकेचे विभागप्रमुख, विभागांचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, वाहतुक पोलीस, सिडको, एम.एम.आर.डी.ए., सार्वजनिक बांधकाम विभाग, एम.आय.डी.सी, एम.टी.एन.एल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, सुरक्षा व आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, रेल्वे प्रबंधक, ए.पी.एम.सी. मार्केट, महावितरण, रॅपिड क्शन फोर्स, बी.ई.एस.टी., नागरी संरक्षण दल, टी.बी.आय.ए., स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असो., केमिकल अॅण्ड अल्कली इंटस्ट्रीयल सोसा., मच्छिमार संघटना यांचे मुख्य अधिकारी, पदाधिकारी यापैकी काही अधिकारी प्रत्यक्षात तसेच अनेक अधिकारी वेब संवाद प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai