एपीएमसीत घाणीचे साम्राज्य
- by Aajchi Navi Mumbai
- May 08, 2026
- 22
आयुक्तांचा संताप ; स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याच्या सूचना
नवी मुंबई ः मुंबई महानगर क्षेत्रातील विविध शहरांना अन्नधान्य व भाजीपाला, फळे पुरविणारे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आशियातील सर्वात मोठी कृषि उत्पन्न बाजारपेठ आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी मार्केट परिसराची एपीएमसी अधिकारी यांचे समवेत संयुक्त पाहणी करून अंतर्गत सफाई अधिक काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले. यावेळी आयुक्तांनी कचरा व्यवस्थापन व अस्वच्छतेवर संताप व्यक्त करत कडक कारवाईचे आदेश दिले.
भाजी व फळ मार्केटमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतुक करणारी जड वाहने येत असतात. त्यांचे वेळांचे नियोजन व्यवस्थित नसल्याने दैनंदिन स्वच्छतेमध्ये अडथळे येतात हे लक्षात घेऊन एपीएमसी प्रशासनाने आठवड्याभरात वेळांचा अभ्यास करून गाड्यांचे वेळापत्रक तयार करावे व त्यानुसार बाजाराच्या अंतर्गत भागातील कचरा संकलनाचे वेळापत्रक आखावे अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. फळे व भाजीपाला मार्केटमध्ये फिरताना त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून व चिखलातून मार्ग काढावा लागला. परिसरातील अस्वच्छता आणि नाल्यांमध्ये साटलेला गाळ पाहून आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मोठ्या प्रमाणात सातत्याने कचरा निर्माण होत असल्याचे लक्षात घेऊन कचरा उचलण्यामध्ये वारंवारता वाढवावी असेही सूचित करण्यात आले. याठिकाणी येणारा भाजीपाला, फळे हा नाशवंत माल असल्याने कुजलेली फळे, नासलेला भाजीपाला टाकून देण्याचे प्रमाण मोठे आहे. या कच-याचा वास मोठ्या प्रमाणात येतो. त्याचप्रमाणे याचे पॅकेजींग साहित्यही गहू, तांदुळ यांच्या तुसाचे असते. तेही टाकून दिले जाते आणि भिजल्यावर कुजते, त्यामुळे या ओल्या कचऱ्याचे त्वरित आणि नियमित संकलन करण्याची क्रिया वारंवार करणे असेही आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. आतमधील भागातील नालेसफाई वेगाने करून घेणे तसेच ते पाण्याने धुवून घेणेची कार्यवाही तत्परतेने करणे गरजेचे असल्याचे सूचित करीत याकरिता महापालिकेच्या सक्शन पंपाचाही उपयोग करून घ्यावा अशी सहकार्याची भावना आयुक्तांनी यावेळी मांडली.
पावसाळी कालावधीत विशेषत्वाने फळ मार्केटच्या पश्चिमेकडील दरवाज्यानजिक पाणी साठते व तेथील छायाचित्रेही प्रसारित होतात याची विशेष दखल घेत त्या ठिकाणाला भेट देत त्याठिकाणची कारणे जाणून घेण्यात आली. मार्केटच्या जमीनपातळीपेक्षा गेटबाहेरील रस्त्याची जमीनपातळी वर असल्याने त्याठिकाणी पाणी साचते हे लक्षात घेत त्याठिकाणी नाल्यांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे रस्त्याला समांतर असणारे बंद गटार पूर्णपणे स्वच्छ करून त्यामध्ये मार्केटमधून येणारा फळांचा व पॅकेजींग साहित्याचा कचरा अडकून राहणार नाही याबाबत उपाययोजना करण्याचेही सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे पावसाळी कालावधीत याठिकाणी अधिकचे पाणी उपसा पंप लावण्याची खबरदारी घेण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले.
भाजीपाला, फळे या आपल्या आहाराच्या गोष्टी असल्याने याठिकाणची स्वच्छता अत्यंत महत्वाची असल्याचे लक्षात घेत याविषयी नियोजन करून त्वरित सुधारणा कराव्यात असे एपीएमसी प्रशासनास सूचित करतानाच याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी एपीएमसी सचिवांसोबत बैठक घेऊन याबाबत पुढाकार घेण्याची भूमिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विशद केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai