बीपीसीएल रिफायनरीत स्फोट

मुंबई : चेंबूरच्या माहुलगाव येथील भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये प्रचंड स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण माहुल-चेंबूरसह सायन परिसर हादरून गेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. या आगीत कंपनीतील 200 ते 400 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

आज दुपारी 3 वाजून 3 मिनिटांनी बीपीसीएलच्या सल्फर प्लान्टमध्ये ही भीषण आग लागली. आग लागल्यानंतर प्रचंड मोठे स्फोट झाले. भूकंप झाल्यासारखे धक्के जाणवल्याने बाजूच्याच माहुलगाव, गव्हाणपाडा आणि विष्णूनगर झोपडपट्टीतील लोक घाबरून घराबाहेर पडले. त्यानंतर लगेच धूर आणि आगीचे प्रचंड लोळ उठल्याने लोक आणखीनच हादरले. त्यामुळे या परिसरात एकच आफरातफर माजली. या स्फोटाचे आवाज येताच भारत पेट्रोलिएमच्या अग्निशमन दलाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. शिवाय कंपनीतील कामगारांनाही बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कंपनीत सुमारे 700 हून अधिक कामगार काम करत असून त्यापैकी आतापर्यंत दोनशे ते अडिचशे कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या 15 ही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी आग विझवण्याचे आणि कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. 

43 कर्मचारी जखमी

हायड्रो-क्रॅकर युनिटमध्ये झालेल्या बॉयलर स्फोटात 43 कर्मचारी जखमी झाले असून त्यातील 21 कर्मचार्‍यांना चेंबूरमधीलच इन्लॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एका कर्मचार्‍याची प्रकृती गंभीर असून त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.