पनवेल पालिकेचा आकृतीबंध मंजूर

पनवेल ः आयुक्त गणेश देशमुख यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आकृतीबंध बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली. स्थायी समितीने या आकृतीबंधाला मंजुरी दिल्यानंतर सोमवारी पनवेल महापालिकेने महासभेच्या मंजुरीसाठी महासभेचे आयोजन केले होते. 

महापालिका स्थापन होऊन 22 महिने झाल्यानंतर आकृतीबंधाला मुहूर्त मिळाला. नव्या आयुक्तांनी सादर केलेला आकृतीबंध चांगला असून आयुक्तांनी महापालिकेच्या दृष्टीने अतिशय मोठी जबाबदारी पूर्ण केली आहे असे कौतुक लोकप्रतिनिधींनी केले. नगरसेवक जगदिश गायकवाड यांनी सफाई कामगारांची भरती लोकसंख्येनुसार व्हावी, असे सांगितले तर नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी गणेश देशमुख यांचे आणि प्रशासनाचे कौतुक केले. सदस्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्या, सुधारणा करून तातडीने नगरविकास खात्याकडे मंजुरी मिळवावी आणि महापालिकेचा कारभार सुरळीत करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षाचे सदस्य हरेश केणी यांनीदेखील आयुक्तांचे कौतुक करीत आकृतीबंधाची प्रशंसा केली. 1913 पदांचा समावेश असलेल्या आकृतीबंधात सध्या प्रतीनियुक्तीवर असलेल्या उपायुक्तांचा, सहाय्यक उपायुक्तांचा समावेश करणार का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. नगरसेवक नितीन पाटील यांनी अशा अधिकार्‍यांची वर्षपूर्ती झाली असल्यास पदमुक्त करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच, महापालिकेच्या दिव्यांग धोरणालाही या सभेत मंजुरी देण्यात आली.

उपमहापौरांचा राजीनामा ः विक्रांत पाटील नवे उपमहापौर 

सत्ताधारी भाजपने उपमहापौरपद एक वर्षासाठी देऊन अनेकांना संधी देण्याचे ठरले असल्यामुळे उपमहापौर चारूशीला घरत यांनी सभेच्या सुरुवातीला पदाचा राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला. नगरपालिकेत सलग पाच वर्षे नगराध्यक्षपद तर महापालिकेच्या स्थापनेनंतर उपमहापौरपद चारूशीला घरत यांच्याकडे होते. पक्ष नेतृत्वाच्या मर्जीत राहून घरत यांनी सहा वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली. ठरल्याप्रमाणे महाराष्ट्र भाजपचे युवा मोर्चाचे सचिव विक्रांत पाटील यांच्याकडे उपमहापौरपद दिले जाणार आहे.